लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापतांना द
लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 13 जागांसाठी मतदान होत असले तरी, मुंबईवर आपले राज्य हवे, यासाठी मुंबईतील सहा जागांसाठी सर्वच पक्षांकडून जोर लावण्यात येत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शुक्रवारी शिवाजी पार्कवर महायुतीची तर बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची जंगी सभा घेण्यात आली. दोन्ही सभांना चांगला प्रतिसाद दिसून आला असला तरी, मतदान कुणाच्या बाजूने होते याचा फैसला 4 जूनरोजीच लागणार आहे. शिवाजी पार्कच्या सभेवर महायुतीने राज ठाकरेंना विशेष महत्व दिल्याचे दिसून येत होते. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या भाषणापूर्वी राज ठाकरे यांचे भाषण होणे अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सभेला संबोधित केले, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी. खरंतर महायुतीला ठाकरे नावाची गरज भासत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरा संघर्ष मुंबईवर कुणाचे राज्य आहे, हीच दाखवण्याची स्पर्धा या सभेतून दिसून येत होती. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे असे समीकरण अनेक दशकांपासून होते. मात्र शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर मुंबई मिळवण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहे. त्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मदत महायुती घेतांना दिसून येत आहे. खरंतर कालच्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे अनेक मागण्या केल्या. त्यातील प्रमुख म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याची मागणी, यासोबतच मराठा साम्राज्याचा इतिहास शाळेत सुरू करावा आणि शिवरायांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करावे, असे साकडे राज ठाकरे यांनी घातले. वास्तविक पाहता मोदी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. एकहाती सत्ता असतांना, आणि मधले अडीच वर्षांचा कालावधी सोडल्यास राज्यात देखील भाजपचे सरकार सत्तेत असतांना पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सौजन्य का दाखवले नाही, हा प्रश्न विचारण्याची गरज होती. खरंतर पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाक, राममंदिराचा प्रश्न सोडवले असे म्हटले जात आहे, मात्र यामागे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे, हे विसरण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नसता तर, अजूनही राममंदिर अस्तित्वात आले नसते. त्यामुळे खरे श्रेय सर्वोच्च न्यायालयाचे आहे. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे मुंबईत कुणाचे पारडे जड ठरणार आहे, त्याचा फैसला 4 जून रोजीच होणार आहे. बीकेसीच्या सभेत काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले विधान देखील महत्वाचे ठरते. ते म्हणजे जनतेने निवडणूक आता हातात घेतली आहे. त्यामुळे खर्या अर्थाने जनतेच्या दरबारात काय फैसला होणार आहे, ते महत्वाचे ठरणारे आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर पुन्हा एकदा आपल्या आक्रमकतेचा परिचय दिला आहे. त्यामुळे मुंबई हातात राहणे किती महत्वाचे आहे, त्यासाठी किती हा आटापिटा सुरू आहे, हे दिसून येत आहे. महाराष्ट्र कुणाच्याही हातात राहो, मात्र मुंबई आपल्या हातात असायला हवी, शिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार निवडून आणून पुन्हा एकदा मुंबईवर आपले वर्चस्व गाजवण्याची खेळी सर्वच राजकीय पक्षांकडून आखण्यात येत आहे. मात्र मुंबईचा मतदार हा सुज्ञ असल्यामुळे तो आपल्या हिताचाच विचार करणार यात शंका नाही. यासोबतच कल्याणमध्ये खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे भवितव्य 20 मे रोजी मतदानयंत्रात बंद होणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबई अशा 13 जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे.
COMMENTS