अहमदनगर/प्रतिनिधी : सध्या भल्या पहाटे वा सकाळी थंडीच्या वातावरणात रनिंग वा अन्य व्यायाम करणार्या महिला चोरट्यांच्या रडारवर आहेत. या महिलांच्या समवेत
अहमदनगर/प्रतिनिधी : सध्या भल्या पहाटे वा सकाळी थंडीच्या वातावरणात रनिंग वा अन्य व्यायाम करणार्या महिला चोरट्यांच्या रडारवर आहेत. या महिलांच्या समवेत रनिंग करीत येणारे चोरटे त्या महिलेला धक्का देऊन खाली पाडतात व तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा करतात. त्यामुळे सकाळी वा पहाटे बाहेर रस्त्यावर वा सार्वजनिक मैदानांतून व्यायाम करणार्या महिलांनी सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 49 वर्षीय महिलेस रनिंग करीत आलेल्या अनोळखी तरुणाने ढकलून खाली पाडून त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून ओढून चोरुन नेले. ही घटना नगर-पुणे रोडवरील विनायकनगर येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की सकाळी फिरायला व मॉर्निंग वॉककरीता गेलेल्या निर्मला सदाशिव भोळकर (वय 49 वर्षे, रा. विनायकनगर) या किशोर गांधी यांच्या घराच्यासमोरुन ज्येेष्ठ नागरिक भवनकडे जाणार्या रोडने पायी जात असताना समोरुन अंगात चॉकलेटी रंगाचे जर्किंग घातलेला, डोक व तोंड वुलनच्या थंडीच्या टोपीने झाकलेला वय अंदाजे 25 वर्षे असलेला एक अनोळखी तरुण रनिंग करीत आला. त्याने अचानक सौ. भोळकर यांना धक्का दिला, तेव्हा त्याखाली पडल्या असता त्याने त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून चोरले. तेंव्हा भोळकर यांनी आरडाओरडा केला असता तो अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी निर्मला भोळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भल्या पहाटे व सकाळी थोडा अंधार असतानाच्या काळात व्यायाम करणार्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या काळात रस्त्यावर फारशी गर्दी नसते. त्यामुळे मंगळसूत्र चोरट्यांना पळून जाणे सोपे होत असल्याने महिलांमध्ये अनामिक भीती पसरू लागली आहे.
COMMENTS