Homeताज्या बातम्यासंपादकीय

कुठे नेमाडे अन् कुठे पाटील !

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनासाठी 'पानिपतकार' विश्वास पाटील यांची अध्यक्षपदासाठी झालेली नाव निवड, ही विद्रोही सांस्कृतीक चळवळी

काचेचे घर आणि दगडफेक ! 
छत्रपती शाहूंची व्यापकता !
सर्वच आता निवडणूकमय ! 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनासाठी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची अध्यक्षपदासाठी झालेली नाव निवड, ही विद्रोही सांस्कृतीक चळवळीने दिलेल्या आव्हानाला, सावरण्याचा एक केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल! विश्वास पाटील यांचं नाव निवड करण्याची पद्धत देखील केविलवाणी म्हणावी लागेल! कारण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे – ज्यांना ‘कोसलाकार’ म्हणून सबंध महाराष्ट्र आणि देशातही ओळखलं जातं; त्यांच्या लेखनाची पद्धत ही दीर्घ संशोधनावर आधारलेली असते. त्यामुळे, ‘हिंदू’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या पुन्हा एकदा भारतीय वाचकांना या देशाच्या सांस्कृतिक समाजाकडे नेण्या मध्ये यशस्वी झालेल्या कलाकृती आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्या बंडखोर प्रवृत्तीला साजेश्या व्यक्तिमत्त्वाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे फारसे पचणारे आणि रुचणारे नाही, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अर्थात, साहित्य संमेलनाच्या आणि एकूणच साहित्य प्रवाहाच्या अंगाने नेमाडे फार विद्रोही आणि बंडखोर टोकाचे नसले तरी, त्यांचं एकंदरीत लेखन इथल्या जातीय संस्कृतीची मांडणी करणार आणि त्या संस्कृतीला गोंजारणारही आहे. परंतु, मूळतः त्यांनी स्वीकारलेला विज्ञानवाद हा व्यापक समाज समूहासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अशा टप्प्यामध्ये विश्वास पाटील हे बसत नाहीत. याउलट, नुकत्याच काही प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखत देताना त्यांनी आपण कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम केल्याचं म्हटलं आहे. कमी बुद्धीचे लोक हे त्यांनी त्याच लोकांना म्हटलेले आहे की, ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ आहे. वास्तविक, आज आरक्षण हे देशातील १००% समाजाला मिळू लागलेले आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी यांना तर आरक्षण आहेच; परंतु, या व्यतिरिक्त आरक्षण नसलेल्या समुदायांनाही घटनात्मक मार्गाने आरक्षण मिळवून घेण्याची पद्धती विकसित करून, उर्वरित सर्व समाजाला आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण या देशात मिळवून घेतले आहे! याचा अर्थ, विश्वास पाटील हे आरक्षण मिळालेल्या या देशातल्या सर्व म्हणजे शंभर टक्के समाज समूहाला कमी बुद्धीचे म्हणताहेत. अशावेळी कमी बुद्धीच्या समाजाकडूनच त्यांची ही निवड होते आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. मुळातच लेखनाच्या नावाखाली प्रशासनामध्ये जनविरोधी काम करणारे पाटील यांना लोकप्रिय करण्याचा हातखंडा, इथल्या व्यवस्थेने वापरला आहे. कारण ही व्यवस्था त्यांना आपल्या हितासाठी वापरू इच्छिते. मराठी साहित्य संमेलनाच्या एकूण चळवळीला विद्रोही साहित्य चळवळीने दिलेले आव्हान, अमळनेर मुक्कामी असलेल्या साहित्य संमेलनात जेव्हा आपण पाहिलं; तर, मुबलक संपन्नता असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मंडप अंमळनेर येथील साहित्य संमेलनात ओस पडला होता; ही वस्तुस्थिती लक्षात घेता, यापुढील साहित्य संमेलन घेताना गर्दी होईल, अशा समाज समूहातून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ही पुढे जाऊ लागली आहे. त्याच अनुषंगाने गेल्या साहित्य संमेलनात तारा भवाळकर या पुरोगामी व्यक्तिमत्त्वाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं.  येणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करून उर्वरित मराठा समाजाला साहित्य संमेलनाकडे आणण्याचा साहित्य संस्कृती महामंडळाचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच! परंतु, या दोन साहित्यांमधला जो संघर्ष आहे तो संघर्ष हा केवळ साहित्याचा नसून तो सांस्कृतिक संघर्ष ही आहे. मात्र, विश्वास पाटील या संघर्षात नेमक्या कोणत्या बाजूने आहेत, ही बाब त्यांची निवड लक्षात आणून देत असली तरी, ही निवड करताना साहित्याच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या तोडीचे ते कसे आहेत, अशा पद्धतीने भालचंद्र नेमाडे यांचं नाव त्यांच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये गोवण्यात आलेले आहे आणि, ही बाब स्पृहणीय नाही.

COMMENTS