Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंडें’चे संस्कार पाहणारे जयंत पाटील यांचे वास्तव काय ?

महाराष्ट्र‌ विधानसभा निवडणूका आता अवघ्या दिड महिन्यावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या रणनिती घेऊन राजकीय हालचाली करित आहेत. त्यात मनसे

नलिनीची मुक्तता आणि परिणाम! 
उध्दव ठाकरे : पुरोगामी गुण चिकटलेला नेता !
सामाजिक ध्रुवीकरणाकडून धार्मिक ध्रुवीकरणाकडे ?

महाराष्ट्र‌ विधानसभा निवडणूका आता अवघ्या दिड महिन्यावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या रणनिती घेऊन राजकीय हालचाली करित आहेत. त्यात मनसे सारख्या पक्षाने तर दोनशेच्या वर जागा लढवण्याची भाषा करित राज्याची सत्ताच हातात घेण्याची वल्गना केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी चे शरद पवार यांचा कलगीतुरा आपण नुकताच ऐकला. महाराष्ट्राच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यातील घुमसता संघर्ष आता स्फोटक स्वरूप धारण करित आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत; अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देणे हा राष्ट्रवादी चा आत्मघाती प्लॅन ठरल्याचे म्हटले आहे. परंतु, यामागील कारणमीमांसा करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचे संस्कार संघाचे असल्यामुळे त्यांनी पक्षातच फूट पाडल्याचे त्यांचे अप्रत्यक्षपणे म्हणणे आहे! जयंत पाटील यांचे राजकारण शिवप्रतिष्ठान चे संभाजी भिडे यांच्या वरदहस्ताने उभे आहे; एवढंच नव्हे तर, दिवंगत आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांच्या राजकारणाचे महाराष्ट्राला मिळालेले फलित संभाजी भिडे असल्याचा आरोप काहीच महिन्यांपूर्वी संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाचे तरूण विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. किंबहुना, राष्ट्रवादी काँग्रेसनेच महाराष्ट्रात संघवादी विचारांना स्पेस दिल्याचा आरोप ही डॉ. कोकाटे यांनी केला होता. प्रविणदादा गायकवाड, गंगाधर बनबरे या मराठा विचारवंतांनी देखील हेच आरोप केले आहेत.

      महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात वेळोवेळी असा आरोप झाला आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील काॅंग्रेसचे अस्तित्व खिळखिळे करण्यासाठी अनेक वर्षे डावपेच केले. दिवंगत विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखालील काॅंग्रेसचा पराभव करण्याच्या राजकीय डावातून महाराष्ट्रात उजव्या विचारसरणीचे राजकारण म्हणजे संघ-भाजपचे राजकारण विस्तारित झाले, यावर अनेक राजकीय समीक्षकांचे मत ठाम आहे. थोडक्यात म्हणायचे तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपला आतून मदत करित असल्याचे आरोप वारंवार महाराष्ट्रात झाले आहेत. परंतु, जयंत पाटील यांचा आत्मविश्वास  वरचा असतो. त्यांना असे वाटते की, लोकांची स्मृती फारच अल्पकाळाची असते. फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेत राज्याचे राजकारणात उजव्या राजकारणाला मजबूत करण्याचा दोष ज्या लोकांवर जातो, त्यात जयंत पाटील यांचे नाव अग्रणी आहे. जे जयंत पाटील विधानसभेचे उपाध्यक्ष असूनही अध्यक्षपदाची भूमिका अतिशय स्पृहणीयपणे पार पाडणाऱ्या झिरवळ यांचा उल्लेख भर सभागृहात, “आदिवासी असूनही बरे काम केले”, असा उल्लेख करतात; त्यांची विचारसरणी आणि संस्कार काय असू शकतात, याची महाराष्ट्राला चांगली जाण आहे. अर्थात, जयंत पाटील यांच्या या विधानाची दखल घेण्याची आम्हाला तशी आवश्यकता वाटत नाही. परंतु, जेव्हा ते एका ओबीसी ला घेऊन उलटे विधान करतात; तेव्हा , त्या विधानामागील जातीय आशय महाराष्ट्राला उलगडून सांगणे, ही आम्ही आमची जबाबदारी किंवा कर्तव्य समजतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात जी काही उलथापालथ निवडणूकीच्या राजकारणातून होईल, तो भाग वेगळा आहे. परंतु, उघड उजव्यांना मोठे करण्यात छुप्या उजव्यांनी जे योगदान दिले आहे, ते महाराष्ट्राच्या पटलावर येणं गरजेचं आहे. अन्यथा, राजकारणाच्या या गुंत्यात सामाजिक आशय केव्हा उजवा होऊन जातो त्याची खबर लागत नाही. त्याची किंमत आज महाराष्ट्राला आरक्षणाच्या आंदोलनाच्या सामाजिक विद्वेषाच्या रूपाने मोजावी लागत आहे. अशा घटनांची वारंवारिता होऊ नये, त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

COMMENTS