वंचित बहुजन आघाडीचा नागपूर विधान भवनावर इशारा मोर्चा आज धडकला या मोर्चात शक्तिप्रदर्शनाबरोबर जे प्रश्न मोर्चाने हाताळले त्यावरून सर्वसामान्य जनत
वंचित बहुजन आघाडीचा नागपूर विधान भवनावर इशारा मोर्चा आज धडकला या मोर्चात शक्तिप्रदर्शनाबरोबर जे प्रश्न मोर्चाने हाताळले त्यावरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानातील लढा करणार असल्याचे स्पष्ट दिसले आहे. मात्र, ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची ख्याती ही आहे की, ते जेव्हा आपलं वक्तव्य करतात, त्यावेळी अनेक विषयांना हात घालत त्यातील स्फोटकता ते समोर आणतात. शिंदे – भाजपा सरकारच्या संदर्भात त्यांनी आक्रमक भाषा वापरत हे सरकार चोरांचे असल्याचे सांगत आपल्याच पक्षाच्या गुंत्यात गुंतल्यामुळे बदलण्याची गरज आहे.
अर्थात, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीपासूनच केवळ न्यायालयाच्या निर्णयाला प्रलंब होत असल्यामुळेच हे सरकार टिकून आहे, असं भाष्य त्यांनी यापूर्वीच बऱ्याच वेळा केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची पुढची री त्यांनी ओढली आहे. त्यामुळे सरकार विरोधातील त्यांचे भाषण हे आक्रमकच म्हणावे लागेल. आजच्या त्यांच्या भाषणात न्यायालयाच्या संदर्भातही संभ्रम कसा निर्माण झाला आहे यावरही एक प्रकारे त्यांनी कडक भाष्य केले आहे. अतिक्रमित गायरान जमिनीच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्ट म्हणते की, मागासवर्गीयांच्या सोडून इतरांच्या जमिनीखाली करा; तर, हायकोर्ट त्या विरोधात नेमकं म्हणतात. अशावेळी नेमकं कोणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, हा प्रश्न उभा राहतो. मग वरच्या साहेबांच्या ऐकायचं की खालच्या साहेबांचे या गोंधळात प्रशासन पडते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला रिक्षा चालकापासून आपल्या जीवनाची सुरुवात झाली असल्याचे जे म्हणतात, त्याचा अर्थ सर्वसामान्य जीवनापासूनच त्यांची सुरुवात झाली आहे, असा होतो. अशावेळी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना कळायला हवेत आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी योग्य तो मार्ग निवडायला हवा. परंतु, असे होताना दिसत नसल्याचेही ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचा इशारा मोर्चा हा प्रामुख्याने नव्या परिस्थितीत निर्माण झालेले कर्मचारी आणि छोटे व्यावसायिक यांच्या संदर्भातला गंभीर प्रश्न घेऊन काढण्यात आला. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेतील शिपाई यांना बारा तासाऐवजी आठ तासाची कर्तव्य किंवा ड्युटी देण्यासंदर्भात मागणी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे होमगार्ड असणाऱ्यांना नोकरीत कायम करण्यात यावे, अशी मागणीही या मोर्चामध्ये करण्यात आली होती.वेगळ्या विदर्भाच्या मागणीबाबत ते म्हणाले की, ”विदर्भवादी म्हणतात विदर्भ घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर पश्चिम महाराष्ट्रातले नेते म्हणतात आम्ही सोडणार नाही.
कारण विदर्भामुळेच राज्याचे वन क्षेत्र प्रमाण टिकून आहे.. विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील अर्धे उसाचे मळे वन क्षेत्रात आणावे लागतील. मग नेत्यांच्या कारखानदारीची अडचण होईल.” असंही त्यांनी परखडपणे मांडले. रिक्षा चालकांचं एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, अशी भूमिकाही या इशारा मोर्चाच्या निमित्ताने मांडण्यात आली. याचाच अर्थ सर्वसामान्य घटकांच्या आर्थिक बदलासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने आपलं कार्य करावं, अशी एक प्रकारे सूचनाच त्यांनी आपल्या इशारा मोर्चात केली. नागपूर विधीमंडळ अधिवेशनावर पहिल्या दिवसापासूनच मोर्चांची धडक होत राहिली. मोर्चांची संख्या पाहता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रचंड प्रमाणात वाढल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.
COMMENTS