Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज; 2 कोटींहून अधिक मतदारांचा सहभाग अपेक्षितमुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक

कार्यकर्त्यांचा हिरमोड आणि गोंधळ !
पुण्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल
राज्यातील नवनिर्वाचित आठशे नगरसेवकांचे अभिनंदन!

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज; 2 कोटींहून अधिक मतदारांचा सहभाग अपेक्षित
मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण प्रशासकीय व सुरक्षात्मक यंत्रणा सज्ज झाली आहे. आज शनिवार (ता. 7) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. शांततापूर्ण व पारदर्शक मतदानासाठी राज्यभर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांबरोबरच त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मूळ नियोजनानुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली. सुधारित कार्यक्रमानुसार आज शनिवारी मतदान होणार असून, मतमोजणी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. 12 जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांपैकी 369 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 125 पंचायत समित्यांतील एकूण 1 हजार 462 जागांपैकी 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी तब्बल 4 हजार 814 उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला आणि 468 इतर मतदार नोंदणीकृत आहेत. त्यांच्या सोयीसाठी राज्यभर 25 हजार 471 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 1 लाख 28 हजार कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, त्यामध्ये 125 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 125 सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा समावेश आहे.


ईव्हीएमची पुरेशी व्यवस्था
मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 51 हजार 537 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटचा समावेश आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आल्याचेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS