Homeताज्या बातम्यादेश

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा आगडोंब

राज्यमंत्र्याचे घर पेटवले काही ठिकाणी ग्रेनेड हल्ले

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाही. केंद्री

पुण्यात गोळीबार करून एकाची हत्या
नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु
आमिरचे डोळे पाणावले; जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं |

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पूर्वनियोजित भेटीच्या एक दिवस आधी, पुन्हा हिंसाचार उफाळला. जमावाने मंत्र्याच्या घराला लक्ष्य करत ते पेटवून दिले. काही ठिकाणी ग्रेनेड हल्लेही करण्यात आले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
मैतेयी समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात 3 मेपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तब्बल 21 दिवसांनंतरही हा हिंसाचार सुरूच आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही काल सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कोंथोइजाम यांच्या घरावर हल्ला झाला. बिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी गावातही हिंसाचार झाला. यावेळी तोयजाम चंद्रीमनी नावाच्या तरुणाला गोळी लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. बिशनपूर, इम्फाळ पश्‍चिम, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील संचारबंदी पुन्हा कडक करण्यात आली आहे. विष्णुपूरमधील हिंसाचारानंतर लोकही रस्त्यावर उतरले. लोक मदत छावणीतून बाहेर आले. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. मंगळवारी चुराचंदपूर परिसरात मेईतेई आणि कुकी समाजाची घरे जाळण्यात आली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, कांगचुक चिंगखाँग जंक्शन इथे पाच राऊंड गोळीबार करण्यात आला. याशिवाय मारुती अल्टो कार पेटवून देण्यात आली. अनेक ठिकाणी ग्रेनेडही फेकण्यात आले. तीन जणांना अटक करण्यात आली.  मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येतील इतर राज्येही चिंतेत आहेत. मणिपूरची परिस्थिती गंभीर असून सरकारने दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी केली आहे. नागालँडनेही आपल्या सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. मणिपूरमधील निम्मी लोकसंख्या मैतेयी समुदायाची आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेयी समुदायाच्या मागणीचा विचार करून चार महिन्यांत केंद्र सरकारला शिफारस पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तेव्हापासून हा आगडोंब उसळला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा होता, असे मैतेयी समुदायाचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत या समुदायाची लोकसंख्या घटली आहे. आपल्या सांस्कृतिक अस्मितेचं रक्षण करण्यासाठी आरक्षण द्यावे, अशी या समाजाची मागणी आहे. तर नागा आणि कुकी जमाती या आरक्षणाच्या विरोधात आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे 34 टक्के नाग आणि कुकी आहेत.

COMMENTS