Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी ः ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी (24 ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेत

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव
करपडी फाटा ते बाभूळगाव दुमाला रस्त्याची दैना
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या  तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग

मुंबई/प्रतिनिधी ः ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी (24 ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्‍वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या.
अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. 1971 मध्ये रिलीज झालेल्या ’आनंद’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात सीमा देव यांनी श्रीमती सुमन कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘कोशिश’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा देव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेऊन स्वत:ला संसारात गुंतवून घेतले होते. पुढे आई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना, आयुष्याच्या एका टप्प्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देवच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. याशिवाय ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या.‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. 1963 सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला. चरित्र अभिनेत्री म्हणून सीमा यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील गाजवले. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांसह त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारी, अनिल कपूर, गोविंदा, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांसारख्या सर्व पिढीतील कलावंतांसह काम करताना आपल्या भूमिकेशी त्या प्रामाणिक राहिल्या. ‘भाभी की चूडियाँ’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियाँ बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे सीमा यांचे हिंदी चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘नंदिनी’, ‘काळी बायको’, ‘या सुखांनो या’, ‘जानकी’, ‘पोरींची धमाल बापाची कमाल’, ‘सर्जा’, ‘जिवा सखा’, ‘कुंकू’ या चित्रपटात देखील त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या.

COMMENTS