Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’निर्भया’तील वाहने पुन्हा महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर शिंदे गटातील 40 आमदार बाहेर पडले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांची मु

महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन
राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करा : अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर शिंदे गटातील 40 आमदार बाहेर पडले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मात्र शिवसेनेतील 40 आमदार बाहेर पडल्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर या 40 आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेली निर्भया पथकातील वाहने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड विरोधकांनी उठवली होती. मात्र कालपासून ही वाहने पुन्हा महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत.


मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलिस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावरुन राज्यातील विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेनंतर आता ही वाहने पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये पाठवण्यात आली आहे. सोमवारी काही बोलेरो गाड्या तर मुंबई बाहेरुन शहरात दाखल झाल्या होत्या. या गाड्या मुंबई पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट युनिटच्या गॅरेजमध्ये उभ्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यंत ही वाहने स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आली. शिवाजी नगर, घाटकोपर आणि मुलुंड स्थानकात वाहने परत करण्यात आली. येत्या काही दिवसांत शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षा ताफ्यात दिलेली वाहने ज्या पोलिस ठाण्यांमधून नेण्यात आली होती तिथे परत केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निर्भया पथकातील वाहनांची स्थिती तपासल्यानंतर आणि आतापर्यंत या वाहनांनी किती किलोमीटरपर्यंत प्रवास केला आहे. याची माहिती लॉगबुकमध्ये घेतल्यानंतरच ही वाहने पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये परत केली जातील. त्यानंतर ते पुन्हा गस्तीसाठी वापरले जाऊ शकतात. या गाड्यांबरोबरच गस्तीवर असलेले चालकही परतले असून ते संबंधीत पोलिस ठाण्यात रुजू होणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने सन 2013 पासून सर्व राज्यांना निर्भया निधी दिला जातो. या निधी अंतर्गत 30 कोटी रुपयांतून मुंबई पोलिसांनी जूनमध्ये 220 बोलेरो, 35 अर्टिगा, 313 पल्सर मोटारसायकल आणि 200 अ‍ॅक्टिव्हा दुचाकी खरेदी केल्या होत्या. जूनमध्ये खरेदी केलेली ही वाहने मुंबईतील 97 पोलिस ठाणी, सायबर, वाहतूक आणि किनारी पोलिस ठाणी यांना वितरित करण्यात आली. राज्य पोलिसांच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागाने पोलिस ठाण्यांमधून 47 बोलेरो जीप परत मागवल्या. पोलिस ठाण्यांकडून परत केलेल्या बोलेरो गाड्या बंडखोर आमदार आणि खासदार यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आल्या. 47 पैकी 17 गाड्या गरज संपल्याने पोलिस ठाण्यांना परत करण्यात आल्या. मात्र, 30 गाड्या अद्यापही आमदार-खासदारांच्या दिमतीला असल्याने पोलिसांना गस्तीसाठी वाहने अपुरी पडत आहेत.

COMMENTS