सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने मराठवाडा, विदर्भ व कर्नाटकातून ऊसतोड मजूर आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्य
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने मराठवाडा, विदर्भ व कर्नाटकातून ऊसतोड मजूर आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कारखानास्थळ व गावागावांत आलेल्या ऊसतोड कामगारांना राज्य शासनाने कोरोना चाचणी व लसीकरण बंधनकारक केले आहे. कामगारांच्या लसीकरणासाठी कारखान्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातले होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यानंतर काही काळ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भावाचा प्रसार होऊन दुसरी लाट आली. जून महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी 40 ते 50 बाधित आढळत आहेत. संभाव्य तिसर्या लाटेचा अंदाज लक्षात घेऊन शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यात 20 ऑक्टोबरपासून ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा ऊस क्षेत्र अधिक असल्याने साधारण मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान हंगाम सुरू राहणार आहे. त्यामुळे कामगारांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री, अजिंक्यतारा, जयवंत शुगर, कृष्णा, किसन वीर यासारख्या गाळप क्षमता जास्त असणार्या कारखान्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून कामगारांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य होणार आहे. आरोग्य विभाग संबंधित कारखान्याच्या परिसरात शिबिरे लावण्यात येणार आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचे काही प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांचे लसीकरण व कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. 100 टक्के लसीकरण होण्यासाठी कारखान्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यास जवळच्या आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण शिबिर राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
COMMENTS