आतापर्यंत चार विशेष मोहिमेत 8 कोटींच्या वीजचोर्यांचा पर्दाफाशसातारा / प्रतिनिधी : पुणे प्रादेशिक विभागात वीजचोरांविरुध्द महावितरणने कठोर कारवाई सुरु
आतापर्यंत चार विशेष मोहिमेत 8 कोटींच्या वीजचोर्यांचा पर्दाफाश
सातारा / प्रतिनिधी : पुणे प्रादेशिक विभागात वीजचोरांविरुध्द महावितरणने कठोर कारवाई सुरु केली असून चौथ्या एकदिवसीय विशेष मोहिमेत 1445 ठिकाणी 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांच्या वीजचोर्या व अनधिकृत वीजवापर उघडकीस आणला आहेत. वीजचोरीविरुध्दच्या नियमित कारवाईसोबत आतापर्यंत एकूण चार एकदिवसीय विशेष मोहिमेत 6428 ठिकाणी 7 कोटी 71 लाख 45 हजार रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश करण्यात आला.
महावितरणची वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात एकाच दिवशी वीजचोर्यांचा शोध घेणे व त्याविरुध्द तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचार्यांचे शेकडो पथके महिन्याच्या एका दिवसात एकाच वेळी पाचही जिल्ह्यात ही कारवाई करत आहेत. तसेच वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणार्या चोरट्यांविरुध्द विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक विभागात शनिवार, दि. 8 रोजी सकाळी 9 वाजता पाचही जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वीजजोडण्यांची तपासणी सुरु झाली. दिवसभरात 12 हजार 410 वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये 1445 ठिकाणी वीजचोरी व विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे 14 लाख 60 हजार 580 युनिटची म्हणजे 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांना चोरी केलेल्या युनिट व दंडाचे वीजबिल देण्यात येत आहे. हे वीजबिल व दंड भरला नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात 551 ठिकाणी 1 कोटी 62 लाख 32 हजार, सातारा- 123 ठिकाणी 9 लाख 81 हजार, सोलापूर- 670 ठिकाणी 22 लाख 48 हजार, कोल्हापूर- 41 ठिकाणी 6 लाख 15 हजार आणि सांगली जिल्ह्यात 60 ठिकाणी 6 लाख 80 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे.
चोरीद्वारे इतर ठिकाणाहून आकडे किंवा केबल टाकून वीज वापर करताना स्वतःच्या, घरातील लहान-मोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जीवघेणा अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर मागेल त्यांना अधिकृत वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच ज्या ग्राहकांचा बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्याही वीजजोडण्यांची विशेष पथकांद्वारे नियमित तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये परस्पर अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडून घेतल्यास किंवा शेजार्यांकडून वीज घेण्याचा प्रकार दिसून आल्यास संबंधित थकबाकीदार ग्राहक व शेजार्यांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
COMMENTS