Homeताज्या बातम्यासंपादकीय

तिसर्‍या आघाडीच्या दिशेने !

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला नसला तरी, निवडणुकीचे पडघम चांगलेच वाजायला सुरू झाले आहेत. महायुतीच विधानसभेची हंडी फोडणार असा दावा सत्ताध

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सुरक्षा ऐरणीवर  
सरकारी निर्णय राज्यास मारक
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला नसला तरी, निवडणुकीचे पडघम चांगलेच वाजायला सुरू झाले आहेत. महायुतीच विधानसभेची हंडी फोडणार असा दावा सत्ताधार्‍यांनी दहीहंडींच्या प्रसंगी केला असला तरी, बदलापूरची घटना आणि शिवरायांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधार्‍यांविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच राज्यात तिसर्‍या आघाडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. असे झाल्यास तिसरी आघाडी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक मते घेवू शकते. नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बहुमत मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे दोघांनाही सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या गटाला सोबत घ्यावे लागणार आहे. अशातच तिसर्‍या आघाडीची चर्चा राज्यात जोरदार रंगतांना दिसून येत आहे. आणि त्या दिशेने पावले देखील पडतांना दिसून येत आहे. याची सुरूवात सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केली असून त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे यांनी एकत्र येत विधानसभा निवडणूक लढण्याची चाचपणी केली आहे. तर दुसरीकडे या तिसर्‍या आघाडीमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे नेते बच्चू कडू देखील येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडून तिसर्‍या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

राज्यात जर चार नेते किंवा पक्ष एकत्र आल्यास महायुती किंवा महाविकास आघाडीला राज्यात सत्ता स्थापन करणे अवघड होवू शकते. अर्थात हा जर-तरचा प्रश्‍न असून, तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. लोकसभा निवडणुकीला थेट महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत झाल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यांचे सर्वाधिक जागा निवडून आल्या. या निकालाने महायुती खडबडून जागी झाली असून, राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने लोकप्रिय घोषणा करण्यास सुरूवात केल्या आहेत. नुसत्याच लोकप्रिय घोषणा केल्याच नाही तर त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील चार-पाच कोटी महिलांना फायदा होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसून येवू शकतो. तर दुसरीकडे विरोधक बदलापूर येथील घटना आणि शिवरायाचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधार्‍यांची कोंडी करू शकतात. राज्यात सध्यातरी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच 10 ते 15 नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विरोधक कोणता कृती कार्यक्रम राबवतो, यावर सत्ताधार्‍यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

याशिवाय जर तिसरी आघाडी अस्तित्वात आली आणि मनोज जरांगे, वंचितचे नेते अ‍ॅड. आंबेडकर, छत्रपती संभाजीराजे, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रहारचे नेते बच्चू कडू असे पाच नेते जर राज्यात एकत्र येत त्यांना छोट्या-छोट्या मित्रपक्षांना सोबत घेत जाग लढल्यास राज्यात एक वेगळी लढत बघायला मिळू शकते. असे जर झाल्यास सत्ता स्थापन करतेवेळी तिसर्‍या आघाडीतील विजयी उमेदवारांचा विचार केल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. वास्तविक पाहता मनोज जरांगे यांनी इच्छूक उमेदवारांचे अर्ज घेतले असून, त्यात तब्बल 900 जणांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपण इच्छूक असल्याचे सांगत अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे आपले उमेदवार निवडणूकीत उतरवतील यात शंका नाही, मात्र ते सोबत कुणाला घेतात, यावर बरेच काही ठरणार आहे. बच्चू कडू आजही सत्ताधार्‍यांसोबत असले तरी, ते सत्ताधार्‍यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात ते बाहेर पडल्यास नवल वाटू नये, याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवरून मतभेद झाल्यास आणि प्रभावी उमेदवारांना संधी न मिळाल्यास ते तिसर्‍या आघाडीचे दार ठोठावू शकतात, अशावेळी महायुती आणि महाविकास आघाडीची पडझड होणार यात शंका नाही. 

COMMENTS