नांदेड : अर्धापूर परिसरात टोमॅटोच्या भावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकर्यांच्या कष्टांचे पुन्हा एकदा लाल चिखलात रूपांतर झाले आहे. महिनोनमहिने

नांदेड : अर्धापूर परिसरात टोमॅटोच्या भावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकर्यांच्या कष्टांचे पुन्हा एकदा लाल चिखलात रूपांतर झाले आहे. महिनोनमहिने घाम गाळून, कर्ज काढून आणि आशेच्या धाग्यावर पिकवलेले टोमॅटो आज बाजारात कवडीमोल दराने विकले जात असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. दर कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी संतप्त शेतकर्यांनी आपला टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला.
अर्धापूरसह आसपासच्या गावांमध्ये यंदा अनेक शेतकर्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मेहनतीची जोड यामुळे शेतात लालबुंद टोमॅटोचे भरघोस उत्पादन झाले. काही दिवसांपूर्वीपर्यंत या पिकाकडून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकर्यांनी धरली होती. मात्र बाजारात अचानक आवक वाढल्याने दरांनी अक्षरशः घसरगुंडी घेतली. सध्या घाऊक बाजारात टोमॅटोचे दर 5 ते 10 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. या दरात शेतकर्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. टोमॅटो पिकासाठी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, ठिबक सिंचन, मजुरी आणि वाहतूक यावर मोठा खर्च करावा लागतो. एका किलो टोमॅटोला किमान 15 ते 20 रुपये दर मिळाला तरच शेतकर्याचा खर्च निघतो, असे शेतकरी सांगतात. मात्र सध्याच्या दरामुळे कष्टाचे चीज तर दूरच, उलट तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक शेतकरी टोमॅटो बाजारात नेण्याऐवजी शेतातच टाकून देत आहेत. काही ठिकाणी संतापाच्या भरात शेतकर्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. रस्त्यावर सांडलेले टोमॅटो पाहताना ते फक्त भाजीपाला नव्हे, तर शेतकर्यांच्या आशा-अपेक्षांचे तुकडे असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. लाल टोमॅटोचा तो ढिगारा जणू शेतकर्यांच्या नशिबात साचलेला लाल चिखलच बनला होता. आमच्या मेहनतीचे मोल मिळत नाही. इतक्या कमी दरात टोमॅटो विकला तर वाहतूक खर्चही निघत नाही. कर्ज काढून शेती करतो, पण बाजारात मालाला किंमतच नाही, अशी व्यथा शेतकर्यांनी व्यक्त केली. दर कोसळल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. कर्जाचे हप्ते, शेतीचा खर्च आणि घरगुती गरजा यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी अधिकच बेजार होत असल्याचे चित्र आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बाजारातील दर नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि शेतकर्यांना हमीभावाची हमी देणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने शेती व्यवसाय अधिकच अस्थिर होत चालला आहे. कष्ट, आशा आणि कर्ज यांच्या चक्रात अडकलेल्या शेतकर्यांच्या वाट्याला पुन्हा एकदा तोट्याचा घाव बसला आहे. लालबुंद टोमॅटोच्या ढिगार्यातून उमटणारी ही वेदना केवळ एका पिकाची नाही, तर शेतकर्यांच्या जगण्याच्या संघर्षाची जाणीव करून देणारी आहे.

COMMENTS