अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर व परिसरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. यातील दोन मुली पुनर्वसन संकुल व निरीक्षण गृहातील आहेत. या संस्थांचे पद
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहर व परिसरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. यातील दोन मुली पुनर्वसन संकुल व निरीक्षण गृहातील आहेत. या संस्थांचे पदाधिकारी व पोलिस या मुलींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, या मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे यात म्हटले आहे.
नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव उपनगरातील भारत बेकरीजवळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमीष दाखवून व फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी (दि.4) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. या मुलीचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे रविवारी (दि.7) सायंकाळी तिच्या वडिलांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुनर्वसन संकुलातून अपहरण
नगर मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील स्नेहालय संचलित पुनर्वसन संकुल येथे आश्रीत असलेल्या 16 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. शनिवारी (दि. 6) सकाळी 11 ते दुपारी 3.30 या कालावधीत ही घटना घडली. याबाबत निवासी शिक्षिका स्वाती रोहिदास बोरगे यांनी रविवारी (दि. 7) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बाल सुधारगृहातून बेपत्ता
येथील मुलींचे निरीक्षण गृह व बालसुधार गृहमधून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना शुक्रवारी दिनांक पाच रोजी घडली. दिनांक 28 जुलै रोजी कोतवाली पोलिस ठाण्यामार्फत एक अल्पवयीन मुलगी ही पुणे बसस्थानक येथे बेवारस मिळून आल्याने तिला निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. दि. 5 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास निरीक्षण गृहातील सर्व मुलींना जेवण देत असताना लक्षात आले की, एक अल्पवयीन मुलगी निरीक्षण गृहात दिसत नाही. तेव्हा संस्थेने तिचा सर्वत्र परिसरात, रेल्वेस्टेशन, बसस्टॅण्ड आदी ठिकाणी फिरुन शोध घेतला, परंतु ती कोठेही सापडली नाही. त्यानंतर तिच्या मूळगावी जाऊन शोध घेतला परंतु ती तेथेही नव्हती. तेथे तिचे वडील भेटले व त्यांनी सांगितले की, मुलीस वारंवार घरातून पळून जाण्याची सवय आहे. त्यानंतरही तिचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने या प्रकरणी मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहाच्या काळजीवाहक रेखा विलास ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. के. दुर्गे करीत आहेत. या मुलीचे वर्णन असे ः वय 16 वर्षे, उंची 150 सें.मी., वजन 42 किलो, रंग-सावळा, डोळे- काळे, केस काळे निस्तेज, अंगकाठी बारीक, राखाडी रंगाचा जर्कीन, फिक्कट पोपटी रंगाची टॉप लेगीज परिधान केलेले आहे.
COMMENTS