देवळाली प्रवरा ः अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपुरात चालू आहे. श्र
देवळाली प्रवरा ः अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपुरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली.मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी हुतात्माहि होऊ असा ईशारा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जिल्हा दौरा निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथे सत्कार केला. दौर्या दरम्यान प्रचंड गर्दीत देखील श्रीरामपूर जिल्हा चळवळीची माहिती जरांगे पाटलांनी समजावून घेत चांगलीच दाद दिली. कोरोना संकटातील अस्थिर वातावरणात देखील समितीने श्रीरामपूर जिल्हा चळवळ खंडित न होता चालू ठेवली. आगामी काळात देखील योद्धा जरांगे पाटलांचे प्रभावी व्यक्तीमत्वाने श्रीरामपूर जिल्हा चळवळ शंभर टक्के यशस्वी करू असा आत्मविश्वास राजेंद्र लांडगे यांनी बोलून दाखविला आहे. आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती श्रीरामपूरसह हरेगाव टिळकनगर येथे झाली. श्रीरामपूरची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध होती. आजमितीला श्रीरामपूरची झालेली वाताहत डोळ्यांला पहावत नाही. यासाठी पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा निर्मिती हाच एकमेव पर्याय हितकरी ठरेल. गतिमान सरकारने जिल्हा विभाजन प्रश्न गांभीर्याने घेण्याची वेळ आहे.श्रीरामपूर जिल्हा झाल्यास उत्तरेतील सर्व तालुक्यांचा सर्वांगीण विकास होईल. सर्वसामान्य जनतेची प्रगती होऊन क्रयशक्ती वाढेल. केंद्र आणि राज्याच्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासनाला सहजतेने राबविता येतील. अनेक नवीन नवीन उद्योग धंदेसह महसुली उत्पन्नाचे श्रोत निर्माण होतील. यासाठी आगामी काळात श्रीरामपूर जिल्हा चळवळ यशस्वी होण्यासाठी श्रीरामपूरसह राहुरी आणि नेवासा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी सामाजिक हित जोपासत लोकसहभाग नोंदविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राजेंद्र लांडगे यांनी शेवटी केले आहे.
COMMENTS