शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !

 हिरोशिमा या शहरावर बाॅम्ब टाकल्याच्या ७७ व्या स्मृतीदिनी जगात एक मोठी घटना घडली, ज्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटणार आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही या

जातीनिहाय जनगणनेला पर्याय नाहींच !
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !

 हिरोशिमा या शहरावर बाॅम्ब टाकल्याच्या ७७ व्या स्मृतीदिनी जगात एक मोठी घटना घडली, ज्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटणार आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही याच सदरात तैवान आणि चीनच्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने शांततामय सहअस्तित्वाचा पर्याय निवडून त्यादिशेने प्रयत्न केले. त्यातूनच जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा जन्म झाला. आर्थिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रिडा आणि सांस्कृतिक, कृषी अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून जगाचे राजकारण आणि सत्ताकारण दोन्ही जनहितार्थ प्रभावी वाटचाल करू लागल्या होत्या. वेगवेगळ्या विचारांच्या आणि राजकीय विचारसरणीचे सरकारे जगात अस्तित्वात होते. पण नव्वदीच्या काळात रशियाचे पतन झाल्यानंतर जगाचा हा समतोल ढासळला. अमेरकेने एकसुरी राजवट निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. याचा परिणाम जगाने निर्माण केलेल्या युनो पासून तर डब्ल्यूएच‌ओ पर्यंत च्या सर्वच आंतरराष्ट्रीय संस्थाचे महत्व कमी झाले. इतकेच नव्हे तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताकाळात कोरोना सारखी जागतिक महामारी सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडून त्यांचा निधी बंद केला होता. या परिस्थितीत स्वतः युनो देखील काही भूमिका अदा करू शकली नाही, इतकी हतबलता जागतिक संस्थांमध्ये आली. जगाला हतबल परिस्थितीत ढकलून ज्या देशांची अमेरिकेसारखी शक्ती वाढत आहे, अशा देशांना युद्धजन्य परिस्थितीत ढकलण्याचा पर्याय अमेरिकेने निवडल्याचे दिसते. त्याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हाऊस प्रसिडेंट नॅन्सी पोल्सी यांनी तैवान ला भेट दिली. तैवान हा जगाच्या दृष्टीने स्वतंत्र देश असला तरी चीन तसे मानत नाही. चीनने तैवान चीनचाच भाग असल्याची भूमिका कायम घेतली आहे. परंतु, अमेरिकाने साथ केल्याने तैवान ने देखील आक्रमक धोरण घेत, ” तैवान चे स्वातंत्र्य अबाधित असण्याची घोषणा केली. या वक्तव्यानंतर चीनने मात्र केवळ युद्धाभ्यास सुरू केला नाही, तर, प्रत्यक्ष युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. हिरोशिमा बाॅम्बस्फोटाच्या स्मृतीदिनीच तैवान चे  अण्वस्त्र प्रमुखाचा एका हाॅटेलमध्ये रहस्यमय पध्दतीने मृत्यू झाला. ही बाब जगाच्या आगामी संघर्षाची नांदी ठरू शकते. अर्थात, तैवानच्या अण्वस्त्र अधिकाऱ्याचा अशा रहस्यमय मृत्यू ला कारणीभूत नेमके काय हे सध्या गुलदस्त्यातच असले तरी आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत करण्यासही ती घटना कारणीभूत ठरू शकते. जगात रशिया विरूद्ध युक्रेन असे युध्द सुरू आहे. त्यातच आता चीन-तैवान या दोघांमधला संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या माध्यमातून होत आहे. त्याचवेळी गाझा पट्टीत इस्त्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात एका लहान मुलींसह किमान १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या दहा वर्षांपासून शांत असणाऱ्या गाझा पट्टीत एकाएकी इस्त्रायल हल्ला करते, ही बाब देखील आगामी काळात जागतिक शांततेला धोक्यात आणणारीच आहे. रशिया – युक्रेन युद्धाला रोखण्यात संपूर्ण जगाला अपयश आले आहे. या युध्दाचे परिणाम म्हणून जग आर्थिक संकटात येऊ घातले आहे, अशा काळात जगातील सर्वच बलाढ्य देशांनी ‘शांततामय सहस्तित्वाच्या’ तत्वाला जागावं. आज कोणताही एक देश युध्द जिंकण्याची शक्ती राखत नाही. अनेक शक्तीस्थळे असणाऱ्या राष्ट्रांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वातूनच जगाची भरभराट होईल, हे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांच्या विनाशकारी स्मृतीदिनाच्या निमित्ताने जगाने लक्षात घ्यावं!

COMMENTS