Homeताज्या बातम्यासंपादकीय

सारे विश्व माणसासाठी, ठणकावून सांगणारे बाबासाहेब!

   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज साऱ्या विश्वात साजरी केली जात आहे. ११ एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबास

दारुसाठी मुलगा मारहाण करायचा म्हणून आईने दिली मुलाची सुपारी.
आरजेएस नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक क्षय दिन उत्साहात
ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरनंतरचा निर्णय नुकसानकारक : बाळासाहेब कोर्‍हाळे

   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आज साऱ्या विश्वात साजरी केली जात आहे. ११ एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले आणि १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचीही जयंती साजरी करण्याचा संकेत महाराष्ट्रात आहे; आणि या जयंती महोत्सवांना संयुक्त जयंती महोत्सव हे नामाभिधान दिले गेले आहे. महापुरुषांची विचारधारा महाराष्ट्रालाच नव्हे, तर, साऱ्या देशाला मार्गदर्शकच नव्हे; तर, कोणत्याही काळात ती त्या-त्या देशाला आणि आपल्या देशाला विकासाच्या आणि मानवतेच्या मार्गावर घेऊन वाटचाल करणारा हा विचार आहे. भारतीय संविधान हे लोकशाहीला प्रदान करून समस्त भारतीयांचे नागरिकत्वाचे अधिकारांची सनद म्हणजे भारतीय संविधान आहे. हे संविधान आज भारताच्या सर्वच राज्यव्यवस्थेला ललामभूत ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे विभिन्न पैलू आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात करताना सर्वप्रथम त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तिमत्व म्हणून जर कुठला पैलू प्रदर्शित झाला, तर तो म्हणजे, पत्रकारिता! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० मध्ये ‘मूकनायक’ च्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला. त्यांच मूळतः शिक्षण हे अर्थव्यवस्थेत होत असताना, त्यांनी कोलंबिया विद्यापीठात मांडलेला प्रबंध, हा अर्थव्यवस्थेची मीमांसा करणारा जसा होता तसाच, तो भारतीय समाज व्यवस्थेतील जातीव्यवस्थेला नष्ट करावे लागेल!  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकारिता, कायदा, इतिहास, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, प्राचीन इतिहास, आधुनिक विज्ञान, मानसशास्त्र, मानववंश शास्त्र, कृतिशील कार्यकर्ते, विचारवंत, तत्वज्ञ अशा वेगवेगळ्या भूमिकातून आपल्याला दिसतात. परंतु, या सगळ्या भूमिकेत त्यांचे एक तत्व अधोरेखित होताना दिसते, म्हणजे या पृथ्वीतलावरचा माणूस हा समग्र क्षेत्राचा केंद्रबिंदू आहे, आणि म्हणून या माणसाचा विकास हाच समाजाचा, देशाचा, प्रांताचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. माणूस हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिला. माणसासाठीच या विश्वातील सारे घटक अस्तित्वात आहेत. त्या घटकांसाठी माणूस नाही, असं अवलोकन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे विश्वातील एकमेव तत्वचिंतक आहेत. या विश्वातील अनेक तत्त्वचिंतकांनी किंवा तत्वज्ञानाने या विश्वाचा आशय किंवा अर्थ समजावून सांगितला; परंतु, या विश्वातील प्रत्येक गोष्टी या माणसासाठीच आहेत! माणूस त्यांच्यासाठी नाही, असं छातीठकपणे बिंबवून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल विश्वातील एकमेव तत्त्वचिंतक आहेत. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्वसूरींना गुरु म्हणून जे स्वीकारलं, त्यामध्ये बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले या तीन महामानवांचा समावेश होतो. त्यामुळे, या तीन महामानवांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वातील एकमेव व्यक्तिमत्व आहे, की जे माणसाच्या साठी सर्व काही आहे, हे मांडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्ताने सारे  विश्व त्यांना कोटी कोटी प्रणाम करीत आहे. मात्र, नेहमीच सांगितली जाणारा एक भाग पुन्हा या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहवत नाही की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेतो; परंतु, त्यांना डोक्यातही घेण्याची नितांत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व कृतीला जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा, कृती आणि विचार यांचा समन्वय त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणून बाबासाहेबांच्या प्रति आपण करीत असलेली प्रत्येक कृती ही विचारांनी परिपूर्ण असली पाहिजे! जर, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ व्यक्ती म्हणून पूजेच्या स्थानावर घेऊन गेलो, तर, वैचारिकदृष्ट्या आपली  वाटचाल गुलामीकडे गेल्याशिवाय राहणार नाही आणि हा बोध आपल्याला या दिवसानिमित्त होणं, हीच आपली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति खरी वैचारिक अभिवादनाची दिशा ठरेल! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या वैचारिक प्रबोधनाचं आणि वैचारिक दिशेची अटळ वाटचाल आपल्या समोर येऊन ठाकते. त्या वाटचालीवर पाऊल टाकण्यासाठी आम्हाला आधी वैचारिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. ही सक्षमता या दिवसानिमित्त आपल्या मनामध्ये पुन्हा त्याच जोशाने आणि जोमाने एकवटेल, यावर आमचा विश्वास आहे.

COMMENTS