Homeदखल

पर्यावरण चळवळीचा आवाज हरपला !

पर्यावरण संरक्षण हा आजमितीस कळीचा मुद्दा बनतांना दिसून येत आहे. या पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची गरज असतांना आपण त्याकडे

शहरांचा श्‍वास कोंडला..!
दूषित पाण्याचे अदृश्य संकट !
दिल्लीची प्रदूषणातून मुक्तता नाहीच

पर्यावरण संरक्षण हा आजमितीस कळीचा मुद्दा बनतांना दिसून येत आहे. या पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची गरज असतांना आपण त्याकडे उदासीन नजरेने बघतो. परिणामी ही समस्या गंभीर होतांना दिसून येत आहे. मात्र आपले संपूर्ण जीवन भारताच्या पर्यावरण चळवळीसाठी झोकून देणारे, भारताच्या पर्यावरण चळवळीने एक तेजस्वी, निर्भीड आणि विज्ञाननिष्ठ आवाज गमावला आहे. ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, नामवंत विचारवंत आणि निसर्गसंवर्धनासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत झटणारे डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक शास्त्रज्ञ हरपलेला नाही, तर पर्यावरणीय प्रश्‍नांकडे मानवकेंद्री, लोकसहभागी आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणारी एक विचारपरंपरा खंडित झाली आहे. विकासाच्या झगमगाटात निसर्गाचा आवाज दाबला जात असताना, त्या आवाजाला वैज्ञानिक अधिष्ठान देणारा हा प्रखर प्रहरी आता इतिहासजमा झाला आहे.
डॉ. माधव गाडगीळ हे भारतीय पर्यावरण विचारविश्‍वातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. पर्यावरण ही केवळ झाडे, जंगलं किंवा प्राणी यांची बाब नसून, मानवी समाज, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेशी घट्ट विणलेली संकल्पना आहे, हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. पर्यावरण संरक्षण म्हणजे विकासविरोध नव्हे, तर विनाशकारी विकासाला विरोध हा त्यांचा स्पष्ट आणि ठाम दृष्टिकोन होता. यामुळेच ते अनेकदा सत्ताकेंद्रांच्या रोषाचे धनी झाले; मात्र त्यांनी कधीही आपली भूमिका मवाळ केली नाही. विशेषतः पश्‍चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. पश्‍चिम घाट हा जगातील जैवविविधतेच्या ‘हॉटस्पॉट’पैकी एक असूनही, अनियंत्रित खाणकाम, धरणे, महामार्ग, पर्यटन प्रकल्प आणि शहरीकरणामुळे त्याचा र्‍हास झपाट्याने होत असल्याचा इशारा त्यांनी दशकांपूर्वीच दिला होता. याच पार्श्‍वभूमीवर स्थापन झालेल्या पश्‍चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ पॅनेलचे (गाडगीळ समिती) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. समितीने सादर केलेला अहवाल हा पर्यावरणीय नियोजनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. गाडगीळ समितीच्या अहवालाने पश्‍चिम घाटातील संवेदनशील परिसंस्था ओळखून, त्या भागात विकासाचे स्वरूप ठरवण्याची शिफारस केली. ‘संपूर्ण बंदी’ऐवजी ‘नियंत्रित, स्थानिक गरजांनुरूप विकास’ ही त्यांची भूमिका होती. मात्र, या अहवालावर उद्योगजगत, राजकीय इच्छाशक्ती आणि काही राज्य सरकारांनी तीव्र आक्षेप घेतले. पर्यावरण आणि विकास यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा देशासमोर उभा राहिला. दुर्दैवाने, अल्पकालीन आर्थिक हितसंबंधांनी दीर्घकालीन पर्यावरणीय सुरक्षिततेवर मात केली आणि गाडगीळ यांचा वैज्ञानिक, समतोल प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिला.
डॉ. गाडगीळ यांची सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे लोकसहभागी संवर्धनाची संकल्पना. पर्यावरणाचे रक्षण केवळ कायदे, आदेश किंवा बंदी घालून होऊ शकत नाही, तर स्थानिक समुदायांचा विश्‍वास जिंकूनच ते साध्य होते, हे ते ठामपणे सांगत. ग्रामसभा, शेतकरी, आदिवासी समाज, मच्छीमार – ज्यांचा जीवननिर्वाह थेट निसर्गावर अवलंबून आहे – त्यांना निर्णयप्रक्रियेचा भाग केल्याशिवाय शाश्‍वत विकास अशक्य आहे, हा त्यांचा मूलभूत विचार होता. आजही ‘विकास’ म्हणजे लोकांवर लादलेला प्रकल्प अशी जी धारणा आहे, तिच्या विरोधात गाडगीळ यांची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरते. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही डॉ. माधव गाडगीळ यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांत मूलभूत संशोधन केले. त्यांनी मांडलेली ‘इकोलॉजिकल हिस्टरी’ची दृष्टी आजही अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज देश-विदेशात पर्यावरण धोरण, संशोधन आणि चळवळींमध्ये सक्रिय आहेत. धोरणात्मक पातळीवरही डॉ. गाडगीळ यांचा प्रभाव मोठा होता. ते पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. मात्र सत्तेच्या जवळ असूनही त्यांनी कधीही सत्तेच्या सोयीस्कर भूमिकेला पाठिंबा दिला नाही. वैज्ञानिक सत्य, पर्यावरणीय वास्तव आणि भविष्यातील पिढ्यांचे हित यांना त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला. त्यामुळेच ते ‘असुविधाजनक सत्य’ बोलणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले गेले. आज हवामान बदल, जलसंकट, जैवविविधतेचा र्‍हास, अति-शहरीकरण आणि नैसर्गिक आपत्ती यांचा देशासह संपूर्ण जग सामना करत असताना, डॉ. माधव गाडगीळ यांचे विचार अधिकच प्रासंगिक ठरतात. पर्यावरणीय संकटे ही निसर्गाची नव्हे, तर माणसाच्या अविचारी विकासाची फलश्रुती आहे, हा त्यांचा इशारा आपण किती गांभीर्याने घेतला, हा प्रश्‍न आता उरतो. डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन ही केवळ व्यक्तीची हानी नाही, तर पर्यावरणीय विवेक हरपल्याची जाणीव आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे, त्यावर कृती करणे आणि निसर्गाशी समन्वय साधणारा विकास स्वीकारणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पर्यावरणाचा हा प्रखर प्रहरी शांत झाला असला, तरी त्याने पेटवलेली चेतनेची मशाल विझू न देणे, हीच आजच्या पिढीची खरी जबाबदारी आहे.

COMMENTS