Homeताज्या बातम्यासंपादकीय

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कल !

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची कसोटी पाहणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका मतदान संपून, आता निकाल लागण्याच्या तयारीत सज्ज झाल्या आहेत.

नवाब मलिकांचा बॉम्ब पवारांनी फुसका केलाय?
न्यायपालिकेचे खडेबोल!
महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची कसोटी पाहणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका मतदान संपून, आता निकाल लागण्याच्या तयारीत सज्ज झाल्या आहेत. या निवडणुकांच्या निकालामध्ये देशभरात ज्या ज्या संस्थांनी एक्झिट पोल घेतले, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या बाजूने अधिक कल दिला आहे. अर्थात, सध्याच्या काळात काँग्रेसकडे कल अधिक असण्यापेक्षा, बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे. याचे महत्त्वाचे कारण, या पाचही राज्यांच्या म्हणजे मिझोरम, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या  विधानसभा निवडणुका, या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक प्रकारची सेमी फायनल म्हणून पाहिल्या गेल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पातळीवरील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अतिशय चुरशीने आणि ताकदीने या निवडणुका लढवल्या. या पाच राज्यांपैकी जर पाचही राज्य भारतीय जनता पक्षाच्या हातून गेले तर, निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीमध्ये आणि धोरणांमध्ये बदल होईल; तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसने जर या पाचही राज्यांची सत्ता मिळवली तर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी मिळून काँग्रेसने जी इंडिया आघाडी गठीत केली आहे, यामध्ये काँग्रेस अधिक शिरजोर होईल. काँग्रेस जर इंडिया आघाडीत शिरजोर झाली, तर निश्चितपणे इंडिया आघाडीच्या घटक दलांना त्याचा फटका बसेल आणि यातून इंडिया आघाडीतील मतभेद बाहेर येण्यास सुरुवात होईल. तर, दुसऱ्या बाजूला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जनमानसाची मानसिकता जर तयार करायची असेल तर, या पाच राज्यांच्या राजकीय सत्ता ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाच्या बाजूने जन्मताचा कौल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अधिक निर्माण होईल. देशभरातील राजकीय पक्ष सत्ता बदलासाठी आतुर असले तरी, कोणीही उघडपणे केंद्रातील सत्ताबद्दल होईल, असं म्हणत नाही. परंतु, देशातील सामाजिक संघटना, विचारवंत हे मोठ्या प्रमाणात सत्ता बदलाच्या बाजूने आहेत. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका या अधिक ताकदीने लढविल्या गेल्या पाहिजे, ही सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत यांचीही भूमिका होती, त्याला काँग्रेस सारख्या पक्षाने दुजोरा दिला. या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली. तेलंगणा सारखे राज्य बीआरएस च्या हातातून जाईल काय, अशीही एक शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, त्यातून वाचण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बी आर एस चे पक्षप्रमुख चंद्रशेखर राव यांनी एक खेळी केली. त्या खेळीनुसार तेलंगणाचा आगामी मुख्यमंत्री शेड्युल कास्ट या समाजातून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. तेलंगणाच्या समाजकारण आणि राजकारणात प्रभाव निर्माण करणाऱ्या शाहीर गदर यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण शेड्युल कास्ट समाजामध्ये त्यांच्याविषयीची सहानुभूती निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणी गदर हे काँग्रेस सोबत होते आणि त्यामुळे काँग्रेसने तेलंगणामध्ये सत्तेवर येण्याइतपत लढत दिली आहे. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसने मजबुतीने लढत दिल्यामुळे, तिथे पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन होण्याची शक्यता अधिक आहे. तर, मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या पंधरा वर्षात ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये सर्वात मोठा व्यापम घोटाळा, यावर ज्या पद्धतीने सगळे काही दाबले गेले, त्याचा आता स्फोट होऊ पाहतो. म्हणून मध्य प्रदेशात काँग्रेस ही अधिक ताकदीने उभी राहील, अशी शक्यता निश्चितपणे व्यक्त केली जात आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस गेली दहा वर्षे सत्तेत असली तरी, पुन्हा काँग्रेस रिपीट होण्याची शक्यता आहे. कारण राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे अशोक गहलोत यांनी मागासवर्गीय समाजाला काँग्रेस सोबत जोडून ठेवण्यात मोठी कसरत केली आहे. मिझोरम सारखे राज्य छोटे असले तरी, मिझोरम सारख्या राज्यामध्ये मणिपूरचा परिणाम राजकीय परिणामांवर निश्चितपणे होईल, असं भाकीत व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे येत्या ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये किंवा यातील बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, अशीच शक्यता दिसते आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने देखील कठीण होणार आहेत.

COMMENTS