अहमदनगर/प्रतिनिधी : मिसरूड न फुटलेल्या व बारावी झालेल्या युवकाचे 36 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणातून जाँबाज लष्करी जवानामध्ये रुपांतर करणार्या नगरमधी
अहमदनगर/प्रतिनिधी : मिसरूड न फुटलेल्या व बारावी झालेल्या युवकाचे 36 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणातून जाँबाज लष्करी जवानामध्ये रुपांतर करणार्या नगरमधील एमआयआरसी या लष्करी संस्थेचा दर्जा उंचावला आहे. ही संस्था आता रेजिमेंटऐवजी स्कूल (शाळा) म्हणून ओळखली जाणार आहे व यामुळे येथील लष्करी प्रशिक्षणातही आधुनिकता येऊन येथे घडणारे लष्करी जवानही अधिक सक्षम व धाडसी होणार आहेत. एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर रसेल डिसुझा यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.
एमआयआरसीच्या येथील मैदानावर शुक्रवारी सकाळी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 77 जवानांना देशसेवेची सामूदायिक शपथ देण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ब्रिगेडिअर डिसुझा यांनी संस्थेच्या नावात व कार्यात झालेल्या बदलाची माहिती दिली. मेकॅनाइज्ड इन्फंर्ट्री रेजिमेंटल सेंटर असे नाव असलेल्या या संस्थेचे नाव आता मेकॅनाइज्ड इन्फंर्ट्री सेंटर अँड स्कुल’ असे झाले असून, यामुळे नगरची ’एमआयआरसी’ आता वरिष्ठ दर्जाची प्रशिक्षण शाळा झाली आहे. लष्कराच्या जवानांना पायदळाच्या सक्षमतेसह चिलखती लढाऊ वाहनांच्या माध्यमातून युद्धतंत्राचे प्रशिक्षण देणार्या नगरमधील यांत्रिकी पायदळ केंद्राला (मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर-एमआयआरसी) आता वरिष्ठ ’अ’ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे नाव बदलून आता ते ’मेकॅनाईज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल (एमआयसी अँड एस)’ असे झाले आहे. त्यामुळे या शाळेतून आता जवानांना अधिक अत्याधुनिक व तांत्रिकतेचे तसेच विविध लष्करी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय जवानांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक तयार करणारी शाळा असेही तिचे यापुढे स्वरूप असणार आहे.
43 वर्षांनी झाला बदल
नगरला ’एमआयआरसी’ची स्थापना सन 1979 मध्ये झाली आहे. 43 वर्षानंतर या संस्थेच्या नावात बदल झाला आहे. आतापर्यंत या केंद्राने लष्करी जवानांच्या प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले, सुविधा निर्माण केल्या, मित्रराष्ट्रांचे अधिकारी-कर्मचारीही येथे नियमितपणे प्रशिक्षणासाठी येतात. लष्करात प्रशिक्षणार्थी दाखल झाल्यानंतर त्यांना खडतर शारीरिक व मानसिक प्रशिक्षण देऊन धाडसी जवान म्हणून घडवणारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आधुनिक व प्रगत यांत्रिकी पायदळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना सिमला तसेच अन्य लष्करी केंद्रात जावे लागत होते. पण आता त्यांना आधुनिक प्रशिक्षण नगरमध्येच मिळणार आहे. नगरच्या केंद्राला यापूर्वी ’ब’ दर्जा होता, तो बदलून हे केंद्र आता ’अ’ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. त्यामुळे नगरच्या या शाळेला ’मेकॅनाईज्ड इन्फंट्री’मध्ये महत्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे.
या शाळेमध्ये आता लढाऊ चिलखती वाहनांवरील ड्रायव्हर, गनर, ऑपरेटर, रीडर कंट्रोलर यांच्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याबरोबरच विविध अभ्यासक्रमही राबवले जाणार आहेत. त्यामुळे जवानांना अधिक तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल, अत्याधुनिक वाहने व शस्त्रे हाताळता येतील. त्याचबरोबर या केंद्राला अधिक निधीही मिळेल. एक पूर्ण दर्जाचे इन्फंट्री स्टेशन म्हणून ही शाळा कार्य कार्यरत राहील, असा विश्वास डिसुजा यांनी व्यक्त केला.
सामाजिक कामही कौतुकास्पद
’मेकॅनाईज्ड इन्फंट्री’मध्ये 27 रेजिमेंट आहेत. त्यातील केवळ नगरच्या केंद्राचा दर्जा वाढवून प्रशिक्षण शाळा केली गेली आहे. या केंद्राला उत्कृष्ट कार्याबद्दल यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजप्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर या केंद्राने पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विकसित केलेल्या ’एमआयआरसी ग्रीन प्रोजेक्ट’ला राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ’प्रियदर्शनी’ पर्यावरण पुरस्कारही मिळालेला आहे.
COMMENTS