धाराशिव ः तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि प्राचीन मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष

धाराशिव ः तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि प्राचीन मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिलेल्या आदेशानंतर आठवडाभराने तुळजापूर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा नोंद केला.
आरोपीमध्ये महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या चार महंतासह मृत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी या सात जणांवर गुन्हा नोंद झाला. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्याची स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली जाणार आहे. कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसीनुसार तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतंत्र तपास समिती गठीत केली आहे. आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत गुन्हा नोंद करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांनी तक्रार देऊनही गुन्हा का नोंद होत नाही अशी विचारणा करीत अधिवेशन संपण्यापूर्वी गुन्हा नोंदविण्याबाबत राज्य सरकारला सूचित केले होते. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागदागिने आणि अलंकार आहेत.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंदिरातील सोने-चांदीचे दागिने व अलंकाराची तपासणी करण्यासाठी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 जणांची समिती गठीत केली होती. या समितीने जुलै महिन्यात आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महंतांच्या ताब्यातील दागदागिने, सेवेदारी, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अधिकार कक्षेत असलेले मौल्यवान प्राचीन अलंकार याची इनकॅमेरा तपासणी केली. त्यात अनेक प्राचीन, दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे समोर आले आहे. तर काही अलंंकार नव्याने त्या ठिकाणी ठेवून शेकडो वर्षे जुना असलेला दागिना गायब करण्यात आला आहे.
दागिन्यात 207 किलो सोने, अडीच हजार किलो चांदीचा समावेश– तुळजाभवानी देवीचे मंदिर पुरातन असून, देवीसाठी विविध राजे-महाराजे, संस्थानिक, मुघल बादशाह, निजाम, पोर्तुगीज, डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे. भाविकांनी मागील 14 वर्षांत श्रध्देपोटी देवीचरणी अर्पण केलेले वाहिक सोने 207 किलो तर अडीच हजार किलो चांदी आहे. शिवकालीन दागिने, वेगवेगळ्या राजदरबारातील नाणी असा समृध्द खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता. मात्र यावर महंतांसह व्यवस्थापनाने डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
COMMENTS