अहिल्यानगर : शहर व जिल्हा तेली समाज व संताजी विचार मंच (ट्रस्ट) आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीने शहरात पार पडलेल्या मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव
अहिल्यानगर : शहर व जिल्हा तेली समाज व संताजी विचार मंच (ट्रस्ट) आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीने शहरात पार पडलेल्या मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्यात राज्यातील तेली समाज एकवटला होता. संताजी महाराजांचा जय घोषाणे संपूर्ण सभागृह दणाणून निघाले. या वधू-वर मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून वधू-वरांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात झालेल्या वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक सतीश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक राहुल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जगन्नाथ गाडेकर, राहुल म्हस्के, दिलीप दारुणकर, विनोद राऊत, जयंत इंगळे, विष्णू सिदलबे, संताजी विचार मंचचे अध्यक्ष सोमनाथ देवकर, विजय काळे, अरविंद दारुणकर, निलेश दारुणकर, संतोष मेहेत्रे, मिलिंद क्षीरसागर, श्रीकांत सोनटक्के, संदीप शिंदे, बाळकृष्ण दारुणकर, दिनकर घोडके, राजू म्हस्के, नितीन फल्ले, प्रीतम शेंदुरकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी संताजी महाराजांची प्रतिमा पूजन करुन आरती करण्यात आली. जय श्रीरामचा नारा देत मान्यवरांचा भगवान श्रीरामची मुर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या तेली समाजातील लोकप्रतिनिधींचा अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
सतीश गवळी म्हणाले की, वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज बनली आहे. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे मुलांचे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी या मेळाव्यातून साध्य होत आहे. लग्न जुळविणे हे पूर्वी पुण्याचे कार्य समजले जायचे. मात्र याचे धंद्यात रुपांतर झाल्याने संस्थेने पुढाकार घेऊन समाजासाठी निशुल्क व्यासपीठ उपलब्ध केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजय काळे म्हणाले की, दरवर्षी वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकत्र येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील अनेक मुला-मुलींचे लग्न जमले असून, त्यांचा सुखी संसार सुरु आहे. निस्वार्थ व सामाजिक भावनेने मुला-मुलींचे लग्न जमविण्याचे कार्य या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. या उपक्रमाला समाजाचा उत्तमपणे प्रतिसाद मिळत आहे. लग्न जुळण्यास समाजासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. श्रीकांत सोनटक्के म्हणाले की, प्रत्येक समाजात मुले-मुली असून देखील योग्य वधू-वर मिळत नाही. एकमेकांच्या भेटीगाठी कमी झाल्याने या समस्या येत आहे. मात्र त्यावर पर्याय म्हणून समाजाचा वधू-वर मेळावा उपयुक्त ठरत आहे. या मेळाव्यातून मुला-मुलींच्या जीवनाच्या रेशीमगाठी बांधले जात असून, समाजातील व्यक्ती हे कार्य समाजकार्याच्या भावनेने करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दुपारच्या सत्रानंतर वधू-वर मुला, मुलींनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येऊन स्वत:चा परिचय करुन दिला. आलेल्या पालकांना निशुल्क वधू-वरांची माहिती असलेली पुस्तिका देण्यात आली.
COMMENTS