नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून ज

नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त खापरखेडा (नागपूर) येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते.

प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी व आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवून चोख उत्तर देण्यात आले आहे. देशावरील कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईल, हा संदेश या निमित्ताने आपण दिला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूया, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.
युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मानवंदना देत व संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने अत्यंत आक्रमक कारवाई केल्याने या युद्धाची परिणीती पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदीच्या मागणीने झाली. हा संपूर्ण देशाचा विजय आहे.
श्री बावनकुळे म्हणाले, या यात्रेच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व देशाच्या एकतेचे दर्शन होत आहे. ही यात्रा आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता आणि अभिमान दर्शवत आहे. अण्णा मोड परिसर ते रेल्वे क्रॉसिंग मार्गावर निघालेल्या या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
COMMENTS