Homeताज्या बातम्यासंपादकीय

केरळमध्ये आभाळ फाटलं

भारताच्या दक्षिण टोकाला असलेले केरळ राज्य पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर राज्य म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्टया आघाडीवर असलेले राज्य, त्याचबरोबर सु

संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
व्यवस्थेला लागलेली कीड

भारताच्या दक्षिण टोकाला असलेले केरळ राज्य पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर राज्य म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्टया आघाडीवर असलेले राज्य, त्याचबरोबर सुंदर असा समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे या राज्याला विशेष महत्व आहे. मात्र या राज्यावर मंगळवारी आभाळ फाटलं. दोनवेळेस झालेल्या भूस्खलनामुळे अनेक घरे जमिनीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, किमान 100 जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. खरंतर भूस्खलनाच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण, आणि गेल्यावर्षीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत अख्खे गाव जमिनीखाली गाडले गेले होते. माळीण गावतर मध्यरात्री मृत्यूच्या कचाट्यात सापडले होते. पहाटेचे बस आली आणि तेव्हा संपूर्ण गाव भूस्खलनात गाडले गेल्याचे समोर आले होते, त्यानंतर सुरू झाला मदत. त्यामुळे या दुर्घटनेने काय दुःख कोसळते, ते महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. खरंतर या गोष्टी नैसर्गिक असल्या तरी, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अतिवृष्टी झाल्यास, भूस्खलन होणार्‍या जागा या सर्वांची नोंदी करून, येथे राहणार्‍या लोकांचे स्थलांतर करून, त्यांना पक्के घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. मात्र सरकार अशा अनेक घटनांमधून पळ काढते. त्यामुळेच अशा घटना घडतात. खरंतर केरळ राज्य सर्वच बाबतीत पुढारलेले राज्य. शिक्षणाचा दरही सर्वाधिक. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्‍चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे.

येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे. अशा या वैविधतेने नटलेल्या या राज्यात भूस्खलनाच्या आढावा घेतला नसेल तर नवल वाटायला नको. खरंतर भूस्खलनाच्या घटना या उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचलप्रदेश, केरळ यासारख्या पर्वतीय प्रदेश असणार्‍या राज्यांत मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येतात. वास्तविक पाहता या पर्वतीय प्रदेश असणार्‍या राज्यांत डोंगर कड्यावरून दरड किंवा खडक कोसळल्यामुळे भूस्खलन होतांना दिसून येते. किंवा जमीन खचल्यामुळे होणार्‍या घटनांना आपण भूस्खलन म्हणतो. वास्तविक या घटना घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस. एकतर हा प्रदेश उंचावर असल्यामुळे याठिकाणी विरळ वस्ती असते. तसेच मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्यामुळे जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचण्याच्या घटना सातत्याने घडतांना दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीच्या काळात वस्ती करून राहणे धोक्याचे आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणार्‍या लोकांचे स्थलांतर करणे हाच महत्वाचा निर्णय ठरू शकतो. खरंतर पावसाळ्याच्या काळामध्ये याठिकाणी थांबण्यासाठी, वस्ती करून राहण्यासाठी बंदी करणे गरजेचे आहे. त्यासोबतच भूस्खलनाच्या जागा निश्‍चित करून, त्याठिकाणी मानवी वस्तीला प्रतिबंध करण्याची खरी गरज आहे. खरंतर भूस्खलन जेव्हा होते, तेव्हा याचा वेग इतका असतो की त्याच्या प्रवाहात येणार्‍या कोणत्याही वस्तू किंवा जीवाला आपल्यासोबत घेऊन जाते.  भूस्खलनाचा अंदाज लावणं हे सहज शक्य नसते. त्यामुळेच त्यावर तात्काळ उपाययोजना शक्य होत नाही. भूस्खलनाचे वहन, स्खलन, डोंगरकड्यावरून खडक कोसळणे असे अनेक प्रकार असतात. त्यातच अतिवृष्टी सुरू असल्यास भूस्खलन होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडण्याचा अंदाज देखील असतो. अशावेळी मानवी स्थलांतर करणेच व्यवहार्य ठरते. त्यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच माळीण, ईशाळवाडी, वायनाडसारख्या घटना थांबवता येवू शकतात, अन्यथा पुन्हा एकदा माळीण, ईशाळवाडी, वायनाडनंतर पुन्हा एकदा नव्या घटना घडेल, यात शंका नाही.

COMMENTS