नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँगे्रस आक्रमक झाला असून, रविवारी देशभर काँगे्रसने संकल्प सत्याग
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँगे्रस आक्रमक झाला असून, रविवारी देशभर काँगे्रसने संकल्प सत्याग्रह केला. यावेळी बोलतांना काँगे्रस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, या देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत. माझ्यावर केस करा. मला तुरुंगात टाका पण मी घाबरणार नाही. परंतु देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत हेच सत्य आहे. आपल्या सत्तेमागे लपत आहेत. ते अहंकारी आहेत आणि या देशाची, हिंदू धर्माची जुनी परंपरा आहे की अहंकारी राजाला जनता उत्तर देते, अशा शब्दात प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेसतर्फे रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि विभाग स्तरावरील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात हे आंदोलन केले जात आहे. दिल्लीत काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते महात्मा गांधी यांच्या समाधी राजघाटावर पोहोचले आहेत. दिल्लीतील राजघाटावरील सत्याग्रहाला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उपस्थिती लावली आहे.
यानंतर बोलतांना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजपकडून सातत्याने आमच्या कुटुंबाचा अपमान केला जातो. संसदेत माझ्या भावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली होती आणि सांगितले होते की मी तुमचा तिरस्कार करत नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. पण आम्ही तिरस्कार पसरवणार्या विचारधारेचे नाही असेही राहुलने सांगितले होते. काँग्रेसने आज संकल्प सत्याग्रह पुकारला आहे. त्यात पुढे त्या म्हणाल्या की, जर तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत असाल तर मला सांगा भगवान श्रीराम कोण होते? त्यांना वनवासात धाडण्यात आले. मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाबतचे जे कर्तव्य होते त्याचे पालन केले. मग राम घराणेशाही मानणारे होते का? असा सवालही प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला. प्रियंका म्हणाल्या, संसदेत माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला. शहिदाच्या मुलाला ’मीर जाफर’ म्हटल गेले. भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, राहुल गांधींचे वडील कोण आहे ? पंतप्रधानांनी संसदेत ’नेहरू आडनावा’वरून प्रश्न उपस्थित केले? तरी, तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही किंवा तुमचे सदस्यत्व रद्द झाले नाही. राहुल गांधी यांनी हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठ या जगातील दोन प्रतिष्ठित संस्थांमधून पदवी पूर्ण केली आहे. पण भाजपचे लोक त्यांना ’पप्पू’ म्हणतात. परंतु जेव्हा लाखो लोक त्यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत आले, तेव्हा भाजपवाल्यांना समजले की, ते ’पप्पू’ नाहीत. राहुल सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेत असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी यावेळी केली.
माझ्या कुटुंबाच्या रक्ताने लोकशाही मजबूत झाली – प्रियांका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी संसदेत असे प्रश्न उपस्थित करत होते, ज्याची उत्तरे मोदी सरकारकडे नाहीत म्हणून ते (मोदी) घाबरले. वेळ आली असून यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी राजघाटावरील संकल्प सत्याग्रहाच्या वेळी सांगितले. ’माझ्या कुटुंबाच्या रक्ताने या देशात लोकशाही मजबूत झाली आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. काँग्रेसच्या महान नेत्यांनी या देशात लोकशाहीचा पाया रचला आहे. जर त्यांना वाटत असेल की ते आम्हाला घाबरवू शकतात, तर ते चुक आहेत, आम्ही घाबरणार नाही, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
COMMENTS