महाराष्ट्राचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर जात आहे, याचा प्रत्यय राज्यातील प्रत्येक नागरिक घेतांना दिसून येत आहे. पक्षाची स्थापना काही लोक एकत्र
महाराष्ट्राचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर जात आहे, याचा प्रत्यय राज्यातील प्रत्येक नागरिक घेतांना दिसून येत आहे. पक्षाची स्थापना काही लोक एकत्र येवून करत असतात, मात्र त्याच पक्षावर बहुसंख्य पदाधिकारी आपल्या राजकीय फायद्यासाठी, स्वार्थासाठी त्याच पक्षावर दावा करतांना दिसून येत आहे. राज्यात काँगे्रस आणि भाजप दोन पक्ष सोडले तर, सर्वच प्रादेशिक पक्षांचा चिखल झाला आहे. यातून प्रामुख्याने प्रादेशिक पक्षाला संपवण्याचे राजकारण सध्या जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना संपल्यागत जमा आहे. ज्या शिंदे गटाकडे आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे, तो पक्ष हे चिन्ह सांभाळू शकेल असे नाही. कारण ती धमक त्यांच्यात नाही. आज शिंदे गटाकडे सत्ता आहे, आमदार आहे, म्हणून पक्ष शाबूत आहे. मात्र निवडणुका झाल्यानंतर शिंदे गट आपला पक्ष सांभाळू शकतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाला आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी केडर बेस पक्ष असावा लागतो, किंवा तसे प्रभावी व्यक्तीमत्व असावे लागते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, या पक्षाने कधीही केडरबेस पक्षाची रचना केली नाही, मात्र शिवसेनेजवळ बाळासाहे ब ठाकरे नावाचे प्रभावी आणि जादूई असे व्यक्तीमत्व होते. त्यांनतर तो करिश्मा काही प्रमाणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आहे. मात्र तो करिश्मा एकनाथ शिंदे यांच्यात नाही. असे असतांना, एकनाथ शिंदे कशाच्या बळावर पक्ष चालवणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याजवळ करिश्मा असणारे नेतेपद नाही, त्यांची वकृत्तवशैली म्हणावी तशी प्रभावी नाही, असे असतांना, आगामी निवडणुकांमध्ये या पक्षाचा टिकाव लागेल, यात शंका आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील अजित पवार गटाने याच पक्षावर दावा ठोकला आहे. अजित पवार गटात अनेक जुने-जाणते नेते आहे. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खुद्द अजित पवार यांचा करिश्मा आहे. जनतेत त्यांना अफाट लोकप्रियता आहे. त्यामुळे हे नेते सहज निवडून येतील, यात शंका नाही. मात्र इतर आमदारांचे काय, हा प्रश्न उरतोच. अजित पवारांनी पदाधिकार्यांच्या सभेत घणाघाती भाषण करतांना, आपल्याला राज्यात आपल्या पक्षाला नंबर वनचा पक्ष बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले. मात्र भाजप हा समोर प्रतिस्पर्धी असतांना, आणि त्यांच्या हातात ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागासारखे शस्त्र असतांना, ते अजित पवार गटाला तोंड वर काढू देतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कालच्या सभेत अजित पवारांनी 90 ते 100 जागा लढवणार असल्याचे देखील स्पष्ट केले. जर अजित पवार गट 100 जागा लढवणार असेल तर शिंदे गट आणि भाजप गट किती जागा लढवणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे राजकारणाचा पुरता चिखल झाला असून, कोणताच पक्ष आज सुस्थितीत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसनंतर आता काँगे्रस पक्ष फुटीच्या उंबरट्यावर असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विश्वजीत कदम भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे काँगे्रसला लवकरच खिंडार पडले तर नवल वाटायला नको. त्यामुळे प्रादेशिक पक्षाची सिद्धी भाजपकडून संपवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी राजकारणात चिखल झाला असला तरी, तो चिखल आगामी काही दिवसांमध्ये देशामध्ये दिसणार आहे, यात शंकाच नाही. एकीकडे विरोधक आपली राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतांना, सत्ताधारी या मोटेला नेस्तनाबूत करतांना दिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांची एकजूट नको तर, जनतेची एकजूट हवी आहे, तीच अशा शक्तींना उलथवून टाकू शकते. मात्र त्यासाठी विरोधकांनी लोकामध्ये जाण्याची गरज आहे. मात्र विरोधक लोकांमध्ये जाण्यात कमी पडतांना दिसून येत आहे.
COMMENTS