Homeताज्या बातम्यासंपादकीय

मिटकरींनी भालदार-चोपदारकी स्वीकारली !

बाटगे अधिक कडवे असतात, या आशयाची म्हण आपण ऐकली जरूर असेल. ऐतिहासिक असलेल्या या म्हणीचा प्रत्यय वास्तव जीवनात येत असतो. अलिकडे तर, सामाजिक भूमिकेत

निवडणूक रणनीतीकारांचे एक वास्तव !
बॅलट उरले फक्त स्मृती पटलावर ! 
राजकीय कोंडी फोडण्याची इतिहास दत्त जबाबदारी ओबीसींचीच!

बाटगे अधिक कडवे असतात, या आशयाची म्हण आपण ऐकली जरूर असेल. ऐतिहासिक असलेल्या या म्हणीचा प्रत्यय वास्तव जीवनात येत असतो. अलिकडे तर, सामाजिक भूमिकेतून राजकीय अड्याकडे सरकलेल्या लोकांविषयी हे तर अधिक प्रखरपणे लागू होते. महाराष्ट्रात सध्या सत्ता कुणाची आहे, हे महत्वाचे नाही; परंतु, महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या अधिष्ठानावर उभा आहे. त्यामुळे, सामाजिक क्षेत्रात चळवळीच्या नावाखाली हजारोंच्या मानधनावर प्रबोधनाचे कार्य करणाऱ्यांची एक लाट आली. या लाटेचे स्वरूप विचार मांडून चंगळ करणारे असेच राहिले. कारण, त्यांना व्यक्ती म्हणून कोणतेही वैचारिक बूड दिसत नव्हते! याच लाटेत अमोल मिटकरी नावाचा माणूस समाविष्ट होतो.‌ “मानधनाशिवाय जाणं नाही, अन् एक दिवस रिकामा नाही,” या गतीला पोहचला होता. अर्थात, मिटकरी यांच्याशी आमचे तसे काही मतभेद नाहीत; वैर तर नाहीच नाही! पण, तरीही आज त्यांच्यावर बोलण्यासाठी आमचा संयम राहिला नाही. त्याचं झालं असं की, काल-परवा महाराष्ट्रात एका विनोदवीराने ‘गद्दार’ शब्द व्यंगात्मक काव्यात गुंफून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. त्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी विनोदी कार्यक्रम झाला, त्या सभागृहाचीच मोडतोड केली. सध्या, अशा हिसांचाऱ्यांना सुगीचे दिवस आलेत. आपल्या धन्याच्या नजरेत सामावण्याची स्पर्धा असल्याने, आपण लवकर कसे नजरेत भरू, या ध्येयापोटी थेट कायदा हातात घेऊन हिंसक प्रदर्शन करण्याची स्पर्धा लागली आहे. असो. तर, गद्दार या शब्दाने ‘स्पर्धकांच्या’ मनाचा कब्जा घेतला आहे. त्यावरून मोडतोड करणारे निघून गेले; परंतु, त्या विनोदवीराने जेव्हा, असं म्हटलं की, ‘गद्दार शब्द मीच थोडा बोललो, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी देखील गद्दार म्हटले आहे.‌ कुणाल कामरा च्या आरोपानंतर अजित पवार यांना लगोलग माध्यमांसमोर यावे लागले. कारण, मामला गंभीर आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या गरिमेचाही आहे. ते म्हटले की, “मी विरोधी पक्षात असताना त्या भूमिकेत बोललो होतो. त्यावेळी ते योग्य होते.” स्वतः अजित पवार यांनी गद्दार म्हटल्याची कबुली दिली आहे. मात्र, प्रबोधनकार आमदार असणारे मिटकरी म्हणतात की, अजित दादांवर बोलताना कुणाल कामरानं आपली औकात बघावी.‌ मिटकरी साहेब, तुम्ही प्रबोधनाच्या चळवळीत असताना गावोगावी भाषणं ठोकताना विचारांची मांडणी करताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरायचे की नाही? त्याच सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत मोठे होवुन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून मिळवलेल्या लोकप्रियतेवर, राजकीय सत्तेत गेले. तिथे, आता इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताना तुम्हाला लोकशाही, आठवत नाही? राजकीय सत्तेच्या नादाला लागून एवढं वाहायचं नसतं. शरदचंद्र पवार आणि अजित दादा या दोघांपैकी जिकडे सत्ता जाईल, तिकडे सरशी करण्याच्या काळात, बराचवेळ दोलायमान राहिले तुम्ही, आता इतरांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण आणण्याची भाषा करताहेत. याचा अर्थ राजकारणात जाऊन असामाजिक वाण तुम्हाला लागला, यात संशय असण्याचे कारण नाही! लोकशाही व्यवस्था, सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत वावरणाऱ्यांना अधिक भावते. परंतु, सत्तेचे माखन ओरबाडून घेण्याची संधी मिळताच, तुम्ही तेथे सरसावला. अलिकडे, सामाजिक चळवळीत आरोप होवू लागले की, हजारो रुपयांचे मानधन ओरबाडून घेणारे खऱ्या अर्थाने सामाजिक कधी नव्हतेच. परंतु, आव आणण्यात काही लोक माहीर असतात. ज्यांना वकुब नसतो त्यांनी आव आणू नये. सामाजिक प्रबोधन करण्याची फुले-शाहू-आंबेडकर-गाडगेबाबा या परंपरेला त्यागाची किनार आहे. समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी महामानवांनी त्यागाची परंपरा प्रशस्त केली आहे. त्या परंपरेत कुठेही न बसणाऱ्या मिटकरी यांनी आता अजितदादा यांची भालदारकी-चोपदारकी स्विकारली आहे का, ज्यात ते कुणाल कामरा याला धमकावताना दिसताहेत!

COMMENTS