मिरजगाव : जवळा अहिल्यानगर बससेवा नागलवाडी गावच्या माजी सरपंच वर्षा डाडर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाली असली तरी ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. बससेवेच्या प्रारंभी जोरदार आगत-स्वागत करण्यात आले होते तसेच चालक-वाहक यांचाही सत्कार झाला होता; मात्र प्रत्यक्षात ही सेवा अनियमित ठरत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सदर बस कधी दोन दिवस सुरू असते तर पुढील अनेक दिवस गायब राहते. ठरलेल्या वेळेत बस गावात पोहोचत नसल्याने प्रवासी तासन्तास प्रतीक्षा करून शेवटी निराश होऊन परत जात आहेत. जामखेड बस डेपोच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांची थट्टाच होत असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ‘गाव तिथे एस.टी.’ हे महापरिवहन मंडळाचे ब्रीद प्रत्यक्षात हरताळ फासले जात असल्याचे चित्र असून जवळा, नान्नज, बावी, फक्राबाद, पिंपरखेड, अरणगाव, सितपूर, नागापूर व नागलवाडी ही आडमार्गावरील गावे असल्याने या मार्गावर अन्य कोणतीही बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या संदर्भात जामखेड आगाराचे वाहतूक निरीक्षक शशी खटावकर यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या बसेस उपलब्ध नसून शाळांच्या सहलींचा मोसम सुरू असल्याने अधिक बसेस त्या कामासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बस उपलब्ध झाल्यानंतर सेवा सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खरे तर जवळा–अहिल्यानगर बस ही ठरवून दिलेल्या मार्गावर आणि निर्धारित वेळेनुसार नियमितपणे चालविणे अपेक्षित आहे. जामखेड डेपोने मनमानी थांबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी; अन्यथा आगारासमोर तीव्र आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा नागलवाडी गावच्या माजी सरपंच वर्षा डाडर व संबंधित मार्गावरील ग्रामस्थांनी दिला आहे.

मिरजगाव : जवळा अहिल्यानगर बससेवा नागलवाडी गावच्या माजी सरपंच वर्षा डाडर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाली असली तरी ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. बससेवेच्या प्रारंभी जोरदार आगत-स्वागत करण्यात आले होते तसेच चालक-वाहक यांचाही सत्कार झाला होता; मात्र प्रत्यक्षात ही सेवा अनियमित ठरत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सदर बस कधी दोन दिवस सुरू असते तर पुढील अनेक दिवस गायब राहते. ठरलेल्या वेळेत बस गावात पोहोचत नसल्याने प्रवासी तासन्तास प्रतीक्षा करून शेवटी निराश होऊन परत जात आहेत. जामखेड बस डेपोच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांची थट्टाच होत असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
‘गाव तिथे एस.टी.’ हे महापरिवहन मंडळाचे ब्रीद प्रत्यक्षात हरताळ फासले जात असल्याचे चित्र असून जवळा, नान्नज, बावी, फक्राबाद, पिंपरखेड, अरणगाव, सितपूर, नागापूर व नागलवाडी ही आडमार्गावरील गावे असल्याने या मार्गावर अन्य कोणतीही बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
या संदर्भात जामखेड आगाराचे वाहतूक निरीक्षक शशी खटावकर यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या बसेस उपलब्ध नसून शाळांच्या सहलींचा मोसम सुरू असल्याने अधिक बसेस त्या कामासाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बस उपलब्ध झाल्यानंतर सेवा सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खरे तर जवळा–अहिल्यानगर बस ही ठरवून दिलेल्या मार्गावर आणि निर्धारित वेळेनुसार नियमितपणे चालविणे अपेक्षित आहे. जामखेड डेपोने मनमानी थांबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी; अन्यथा आगारासमोर तीव्र आंदोलन छेडून जाब विचारला जाईल, असा इशारा नागलवाडी गावच्या माजी सरपंच वर्षा डाडर व संबंधित मार्गावरील ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS