खरंतर गेल्या काही दशकांपासून राजकारणाची कूस बदलली आहे. तत्वनिष्ठा, विश्वासार्हता ही शब्द राजकारणात तरी परवलीची झाली आहे. मात्र डाव्या चळवळीत अजू
खरंतर गेल्या काही दशकांपासून राजकारणाची कूस बदलली आहे. तत्वनिष्ठा, विश्वासार्हता ही शब्द राजकारणात तरी परवलीची झाली आहे. मात्र डाव्या चळवळीत अजूनही तत्वनिष्ठा या शब्दाला महत्व आहे. कारण या चळवळीतून आलेला कार्यकर्ता शक्यतो पक्ष सोडत नाही. आपल्या तत्वनिष्ठेशी आणि विचारांशी बांधील राहतो, त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सीताराम येचूरी. अलीकडच्या काही दशकांपासून जे घावूक पक्षांतर होतांना दिसून येत आहे, जी फोडाफोडी होत आहे. या सर्व बाबी बघितल्या की डाव्या चळवळीकडे पाहावासे वाटते. यातील बहुतांश नेते आपल्या चळवळीशी बांधील असतात. देशामध्ये सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न, त्यांच्या चळवळीची असलेली बांधीलकी आणि त्याप्रती त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वाहून घेतलेले बघितले की जीवन थक्क होते. कारण इतके समर्पित जीवन येते कुठून. सीताराम येचुरी एक आश्वासक चेहरा होता. अतिशय बुद्धीमान असलेला हा नेता काळाच्या पडद्याआड गेला. एकीकडे डावी चळवळ दुसरीकडे काँगे्रसमध्ये सत्तेत सहभागी होणे, ही दुरापास्त गोष्ट. मात्र येचुरी यांनी ती किमया साधली होती. किमान समान मुद्दयांवर आणि समान कार्यक्रमावर त्यांनी काँगे्रससोबत सत्तेत जाण्याचे ठरवले होते. त्यांनी 1996 मध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यांनी 2004 मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे येचुरी यांच्यासारख्या नेत्याची आजमितीस देशाला गरज असतांना त्यांचे असे अचानक सोडून जाण्यामुळे डाव्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
देशातील राजकारणाची कूस बदलत असतांना येचुरीसारख्या नेत्यांनी आदर्श निर्माण केला आहे. डावी चळवळ केरळ, पश्चिम बंगालसारख्या राज्यात काही वर्षे सत्तेवर राहिली असली तरी देशावर सत्ता येण्यासाठी अनेक शतक जावे लागतील, याची कल्पना येचुरी यांना होती. त्यामुळेच त्यांनी 1989 ते 2014 या काळात भाजपला पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांनी जी भूमिका बजावली तिचे विशेष स्मरण ठेवले जाईल. खरंतर आंध्रप्रदेश राज्यातील येचुरी कुटुंब. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या. सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी एम.ए. अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. अर्थात या विद्यापीठातच त्यांच्यातील नेतृत्वगुण समोर आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुशीतून तयार होत असतांना त्यांनी आपली वैचारिक बैठक देखील पक्की केली होती. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणार्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते. सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात सक्रिय झाले होते. ते जेएनयू विद्यार्थी संघाचे तीनवेळा अध्यक्ष बनले होते. येचुरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचे ते आंदोलन चांगलेच गाजले होते. तेथुनच त्यांच्या राजकारणातील श्रीगणेशा झाला. त्यानंतर ते तीनवेळेस माकपचे अध्यक्ष, सरचिटणीस या पदावर कार्यरत राहिले. मात्र त्यांनी कधीही बडेजाव गाजवला नाही. खरंतर खर्या डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांने संसदेच्या गोलाकार इमारतीपासून दूर राहणेच हितावह असते. कारण एकदा का या संसदेच्या गोलाकार इमारतीत गेल्यानंतर राजकारणाचा स्पर्श होतो आणि मग तो कार्यकर्ता इतर पक्षांसारखा राजकीय कधी वागू लागतो तेच कळत नाही. मग त्याला सामाजिक समता, आपले आंदोलन, या सर्व बाबींचा विसर पडतो. मात्र येचुरी त्याला अपवाद होते. ते तब्बल 12 वर्ष राज्यसभेचे खासदार होते, मात्र त्यांनी सतत शोषित-पीडितांसाठीच राजकारण केले. त्यांचा आवाज बनण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
COMMENTS