पहाटेच्या शपथेचे कवित्त तब्बल तीन वर्षानंतर देखील संपत नाही, यातच सर्व काही आले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे बहुमत
पहाटेच्या शपथेचे कवित्त तब्बल तीन वर्षानंतर देखील संपत नाही, यातच सर्व काही आले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे बहुमत स्पष्ट असतांना देखील तत्कालीन शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. अडीच वर्ष तुम्हाला आणि उर्वरित अडीच वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद हवे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे दूत संजय राऊत शरद पवारांच्या संपर्कात राहून महाविकास आघाडीचा प्रयोग करत होते. तर दुसरीकडे सत्ता राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना फोन करत होते, मात्र सगळे पत्ते उद्धव ठाकरेंच्या हातात असल्यामुळे त्यांनी त्यावेळी फडणवीसांचा फोन घेणे, समन्वयातून तोडगा काढणे, यावर मात करत महाविकास आघाडीची प्रयोग अस्तित्वात आला. मात्र तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू होती. ती उठवायची म्हणजे केंद्राची परवानगी हवी, तरच राज्यपाल राष्ट्रपती राजवठ उठवू शकतील. मात्र तोपर्यंत महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी संपन्न देखील झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर माध्यमांची लागलेली स्पर्धा, आज हा आमदार कुठे, तो कुठे, अजित पवारांनी आपल्याला काहीच सांगितले नाही, मुंडे नॉट रिचेबल, अशा बातम्या धडकत होत्या. आणि सर्वसामान्य माणूस राज्यातील या राजकीय भूकंपावर तासनतास टीव्हीसमोर वार्तांकन ऐकत होता. मात्र तीन वर्षांनंतर या शपथविधीचे अर्धसत्य बाहेर येतांना दिसून येत आहे. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला, तर दुसरीकडे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झाला, अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असे वक्तव्य खुद्द शरद पवारांनीच केले आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीची आपल्याला कबुली होती, अशी अप्रत्यक्षच कबुली शरद पवारांनी दिली आहे. फडणवीसांनी यासंदर्भात बोलतांना सांगितले आहे की, ’’आम्ही निवडून आल्यानंतर आमचे शिवसेनेशी बोलणी सुरू होती. तेव्हा ते काँग्रेस आणि एनसीपीसोबत सत्तास्थापन करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले. आम्ही काँग्रेससोबत जावू शकत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळीही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता.’’ त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं, जनतेनी नेमका कुणावर विश्वास ठेवावा. राज्यातील जनतेला अंधारात ठेवून, राजकीय गेम खेळला जातो, याचे हे मूर्तींमंत उदाहरण. राज्यात अजित पवारांनी बंड केले म्हणून त्यांना खलनायक ठरवण्यात आले, नंतर त्यांना महाविकास आघाडीमध्ये नंबर दोनचे अर्थात उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणातील अर्धसत्य बाहेर आले असले तरी, संपूर्ण सत्य अजूनही बाहेर आलेले नाही. आणि ते लवकर बाहेर येईल, याची शक्यता तशी कमीच आहे. कारण राजकारण नेहमी आपल्या सोयीचे करायचे, असा पवित्रा सर्वच पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे आपल्या सोयीचे तेवढे सांगायचे, बाकी उर्वरित अंधारात झाकून ठेवायचे असला हा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र येणार्या विधानसभा निवडणुकीत या अर्धसत्यावरून पडदा उठेल, आणि पूर्णसत्य महाराष्ट्राला ऐकायला मिळेल, यात शंका नाही. कारण या उर्वरित अर्धसत्याचा वापर भाजप विधानसभा निवडणुकीत करेल, यात शंका नाही.
COMMENTS