सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ; राष्ट्रवादीचा देखील येणारा निकालमुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित आणि दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या भव

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ; राष्ट्रवादीचा देखील येणारा निकाल
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित आणि दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर परिणाम करणार्या महत्त्वाच्या प्रकरणांवर आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावर येत्या बुधवारपासून (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेणार आहे.
या सुनावणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हासंबंधीचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन येणार असून, राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे निर्णय लवकरच समोर येण्याची चिन्हे आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारत स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यानंतर समर्थक आमदार व खासदारांसह त्यांनी प्रथम गुजरात व नंतर गुवाहाटी येथे मुक्काम केला. बहुमताच्या आधारे शिंदे गटाने शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर दावा सांगितला. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला असता, आयोगाने संख्याबळाचा आधार घेत शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांना अपात्र न ठरवता पात्र ठरवण्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णयही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी न्यायालयात आव्हानित केला आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्यात महापालिका, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची प्रक्रिया पार पडली असून, आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत होणार्या अंतिम सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व ‘घड्याळ’ चिन्हावरही सुनावणी
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट आणि ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरील वादही सर्वोच्च न्यायालयात चर्चेला येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली आहे. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात जयंत पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. शिवसेना प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे.
सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद
या प्रकरणावर नोव्हेंबर महिन्यात मागील सुनावणी झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी 21 आणि 22 जानेवारी या दोन तारखा निश्चित करत, सलग दोन दिवस केवळ याच प्रकरणांवर युक्तिवाद ऐकून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. या कालावधीत इतर कोणतेही प्रकरण सूचिबद्ध न करण्याचे निर्देशही कोर्ट मास्टरना देण्यात आले होते.

COMMENTS