Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल

बोटावरील शाई प्रकरणावर खा. राहुल गांधी आक्रमकमुंबई : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीदरम्यान बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याच्या आरोपांवर राजकी

निवडणूक आयोगाची मुजोरी सुरूच!
बिनविरोध नगरसेवक चौकशीच्या फेर्‍यात
अर्ज फेटाळ्याप्रकणी आज निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात सुनावणी
rahul gandhi

बोटावरील शाई प्रकरणावर खा. राहुल गांधी आक्रमक
मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीदरम्यान बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याच्या आरोपांवर राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मतांची चोरी हे देशविरोधी कृत्य आहे. निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल होत असेल, तर लोकशाहीवरील विश्‍वास संपुष्टात येणे अपरिहार्य आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
गुरुवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदानानंतर लगेचच बोटावर लावलेली शाई सॅनिटायझर किंवा इतर द्रव्यांनी निघत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्वतः प्रयोग करून शाई पुसली जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने एकत्रितपणे निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार सुरू केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट आरोप करत, नव्या मार्कर पेनमुळे मतदान प्रक्रियेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्या आहेत, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत, बोटावरील शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात आहे, असा गंभीर आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर एक वृत्त शेअर करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले.
मतदानानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, आतापर्यंत वापरली जाणारी शाई टिकाऊ होती. मात्र यावेळी वापरण्यात आलेल्या मार्करमुळे सॅनिटायझरने शाई सहज निघत आहे. यावर सर्वच बाजूंनी तक्रारी येत आहेत. निवडणूक आयोगाने प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला, जो कोणत्याही नियमांत बसणारा नाही. सत्तेच्या फायद्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे चित्र आहे. ही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, 2011 पासून मार्कर पेनचा वापर केला जात आहे. शाई लावल्यानंतर ती वाळण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. एकदा शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. हीच शाई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतही वापरली जाते. तसेच, एखादा मतदार पुन्हा मतदानाचा प्रयत्न करत असल्यास संबंधित अधिकार्‍यांकडून तत्काळ कारवाई केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाई पुसली जात असल्याचा मुद्दा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी पुढे आणला जात असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.

मतांची चोरी राष्ट्रविरोधी
खा. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, निवडणूक आयोगाकडून होत असलेली दिशाभूल ही लोकशाहीसाठी घातक आहे. मतांची चोरी ही केवळ राजकीय नव्हे, तर राष्ट्रविरोधी कृती आहे. त्यांच्या या भूमिकेला काही नागरिकांनी पाठिंबा दिला असून, तर काहींनी विरोधी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र बोटावरील शाईचा प्रश्‍न लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS