नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी, 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी, 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व करतील. राज्यघटनेच्या स्वीकृतीची 75 वर्षे आणि जन भागिदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण असेल. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘जन भागीदारी’ वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून सुमारे 10,000 विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणार्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणार्यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे चालेल. या सोहळ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील आणि शहीद झालेल्या वीरांना संपूर्ण देशाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावरील सलामी मंचाकडे रवाना होतील. राष्ट्रपतींचे अंगरक्षक जे भारतीय सैन्यातील सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे त्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात राष्ट्रपती आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे आगमन होईल. दोन्ही राष्ट्रपती ‘पारंपारिक बग्गी’ मधून दाखल होतील. 40 वर्षांच्या कालावधीनंतर 2024 मध्ये ही प्रथा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. 105-मिमी लाइट फील्ड गन या स्वदेशी शस्त्र प्रणालीचा वापर करून 21 तोफांची सलामी दिली जाईल. देशाच्या विविध भागांमधील संगीत वाद्यांसह 300 सांस्कृतिक कलाकार ‘सारे जहाँ से अच्छा’ ची धून वाजवत या संचलनाला प्रारंभ करतील. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्लीच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 70 हून अधिक कंपन्या आणि सुमारे 15 हजार पोलिस तैनात केले जातील. तसेच सुरक्षेचे 6 स्तर असतील आणि फेशियल रेकग्निशन सिस्टमने (एफआरएश) सुसज्ज 100 हून अधिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थिचा सामना करण्यास सज्ज असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
प्रथमच तीनही दलांचा चित्ररथ
कर्तव्य पथावर पहिल्यांदाच तिन्ही दलांचा चित्ररथ सादर केला जाणार असून, त्यामाध्यमातून तीनही दलांमधील एकजीनसीपणा आणि एकात्मतेच्या भावनेचे दर्शन घडवले जाणार आहे. यासोबतच शिस्त, लवचिकता आणि अढळ निष्ठेचे प्रतीक असलेल्या आपल्या माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने ’विकसित भारताच्या दिशेने सदैव अग्रेसर’ या संकल्पनेअंतर्गतचा चित्ररथ हे या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे.
COMMENTS