Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ताधारी आणि विरोधकांची ‘दिशा’  

राज्यातील असो की, देशातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने राजकारण करतांना, ते विकासाभिमुख असायला हवे. जर राजकारण विकासाभिमुख असेल, तर विकास होण्याचा मार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सुरक्षा ऐरणीवर  
वाढते अपघात चिंताजनक…
कथनी आणि करणीतील फरक

राज्यातील असो की, देशातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने राजकारण करतांना, ते विकासाभिमुख असायला हवे. जर राजकारण विकासाभिमुख असेल, तर विकास होण्याचा मार्ग मोकळा होता. मात्र विरोध करायचा म्हणून करायचा, त्यांनी आमचे नाक दाबले, तर आम्ही त्यांचे तोंड दाबणार असे राजकारण सध्या महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अनुभवतांना दिसून येत आहे.


खरे तर हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असे संकेत अगोदरच मिळत होते. मात्र सुरुवातीचे तीन दिवस थोडी खडाजंगी सोडली, तर बर्‍यापैकी विविध विषयांवर चर्चा झाली. मात्र बुधवारी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तो एयू कोण असा सवाल करत, त्यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल केला, असा सवाल करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर बोट दाखवले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कुठे चालली आहे असा सवाल यानिमित्ताने विचारावासा वाटतो. यावर विधिमंडळात खडाजंगी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्याची घोषणा केली. त्यातच उपमुख्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केला की, सुशांतसिह राजपूत प्रकरणात सीबीआयने चौकशी केली आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही मुंबई पोलिसांकडेच आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणी बरेच राण उठविले होते. तिच्यावर अत्याचार झाला, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिथे कोण मंत्री उपस्थित होता, असे सवाल राणे यांनी उपस्थित केले होते. एकीकडे आदित्य ठाकरेंवर मोघम टीका सुरू होती, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप होऊ लागले. जर या प्रकरणाचा गुंता खरोखरच मोठा होता, तर तत्कालीन विरोधकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी का केली नाही.

विरोधक असतांना, याप्रकरणी सरकारला का घेरले नाही, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विरोधकांनी सरकारला भूखंड घोटाळाप्रकरणी कोंडी करण्याचा प्रयत्न करताच, दुसर्‍या दिवशी लोकसभेत एयूच्या नावाने राहुल शेवाळे यांनी बॉम्बगोळा टाकला. त्यानंतर विरोधकांनी देखील खासदार शेवाळे यांचे अनेक तथाकथित व्हिडिओ बाहेर काढून ते व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे तुम्ही आमचे एक प्रकरण बाहेर काढाला, तर आम्ही तुमचे दुसरे प्रकरण बाहेर काढू अशी स्पर्धाच सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यातून एक-एक पक्ष आपल्याच सहकार्‍यांचे वस्त्रहरण करतांना दिसून येत आहे. मात्र एकमेकांचे वस्त्रहरण करत असतांना, महाराष्ट्राच्या विकासाचे काय. कोरोनामुळे दोन वर्षांपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरळीत झालेले नाही. त्यातच यंदा अधिवेशन होत असतांना, ते अधिवेशन वाया जातांना दिसून येत आहे. त्यातच चीनमधील कोरोनाचे सावट देशावर आणि महाराष्ट्रावर घोंघावतांना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत विकास कामांना गती देण्याची एक सुसंधी असतांना, ती खडाजंगीत घालवतांना आपण दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरलेले अपशब्द, विधिमंडळाची मर्यादा ओलांडणारी आहे. अपशब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून जयंत पाटील विधानसभा अध्यक्षांना त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकले असते. मात्र जयंत पाटील यांचा अविवेक हरवल्याचे त्या घटनेवरुन दिसून येते. त्यातच विरोधक आणि सत्ताधारी या दोघांचा विकासाची दिशा चुकतांना दिसून येत आहे. त्यामुळे दोघांनी देखील आपली विकासाची दिशा रुळावर आणण्याची गरज आहे. तसेच एक-मेकांची वस्त्रहरण करतांना आपण महाराष्ट्राचे वस्त्रहरण करत आहोत, याचे तरी त्यांनी भान ठेवावे इतकेच.

COMMENTS