Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुप्तांची काळी ‘माया’ गुप्त राहीली नाही !

 महाराष्ट्र पोलीस केडरचे आयपीएस अधिकारी तथा सध्या इंडो तिबेट बाॅर्डर पोलिसमध्ये अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले आणि पुण्याचे

भ्रष्टाचार विरोधी नेत्याची, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रवानगी !  
नव्या लोकसभेच्या दिशेने….!
जागतिक आरोग्य संघटना आणि मानवी हीत!

 महाराष्ट्र पोलीस केडरचे आयपीएस अधिकारी तथा सध्या इंडो तिबेट बाॅर्डर पोलिसमध्ये अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक किस्से आता बाहेर आले आहेत. पोलिस प्रशासनात बेदरकारपणे भ्रष्ट व्यवहार करणारे गुप्तांची गुप्त चौकशी करणाऱ्या यंत्रणांना ज्ञात झालेली संपत्ती, किमान साडे तीनशे कोटींची आहे. पोलीस कारकीर्दीत वेगवान प्रमोशन झालेले अमिताभ गुप्ता हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी कोरोना काळात सुरू असलेल्या लाॅकडाऊन दरम्यान वधवान या अती श्रीमंत कुटुंबाच्या २३ सदस्यांना महाबळेश्वर येथे जाऊन मौज करण्याच्या आदेश पत्रावर स्वाक्षरी केली होती. यावरही त्यांची चौकशी त्या काळात झाली होती. एवढेच नव्हे, तर मागील निवडणुकीच्या काळात म्हणजे अगदी मतदानाच्या एक दिवस आधी, अमिताभ गुप्ता यांचे एक गुप्त संभाषण सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या दरम्यान होत असल्याचा आरोप करणारी एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यात बिटकाॅईनचा संदर्भ असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यासंदर्भात निवृत्त आयपीएस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भारतीय निवडणूक आयोगाकडे सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर, सुप्रिया सुळे यांनी तक्रारीत गौरव मेहता आणि पुण्यातील माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

      अमिताभ गुप्ता अगदी शाही उपभोगवादी जीवनाच्या आदी झाल्यामुळे पुणे येथे एक प्रचंड विलासी व्हिला आणि मुंबईत पंचतारांकित फ्लॅट अशी त्यांची निवासाची साधने आहेत. परंतु, कहर मात्र तेव्हा होतो, जेव्हा ते पुण्याचे आयुक्त असताना पिस्तूल वा बंदूकीचा परवाना देण्यासाठी त्यांनी प्रत्येक व्यक्ती कडून १५ ते २० लाख रुपये घेतल्याचा आरोप, माहिती अधिकारातून माहिती मिळवलेले, परंतु, मुळ भाजप नेते असलेले सुधीर आल्हाट यांनी केला आहे. आरटीआय कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली. सुरुवातीच्या चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित, एसीबीने औपचारिकपणे खुल्या तपासासाठी परवानगी मागितली आहे. जर परवानगी मिळाली तर, गुप्तांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर होऊ शकते. बंदूक किंवा पिस्तूल परवाना देताना त्यांनी जे पैसे लोकांकडून उकळले वा वसुल केले म्हणा, त्याचा गुणाकार करण्याचा प्रयत्न केला तर, एवढी मोठी संख्या बनली की, त्यातील शून्य मोजणे अवघड झाले. प्रशासनातील अधिकारी हे जनतेचे सेवक असतात, असं आपण वारंवार म्हणत असतो. परंतु, त्यांनी लोकांचा छळ करूनच जमवलेली माया अय्याशी करायला ते वापरतात. सामान्य लोकांविरुद्ध खोट्या केसेस करून पैसा उकळण्याचा गुप्तांचा धंदा आता गुप्त राहिला नाही. थोडक्यात, सांगायचे म्हणजे अमिताभ गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात ‘गुप्त’धन जमविले असले तरी, ते आता गुप्त राहिलेले नाही. अर्थात, माहिती अधिकारात माहिती मिळवणारे सुधीर आल्हाट यांनी एक मात्र स्पष्टपणे म्हटले आहे की, गुप्त चौकशीत ज्ञात झालेल्या मालमत्तेपेक्षा अज्ञात असणारी मालमत्ता अधिकही असू शकेल. याचा अर्थ असा होतो की, अमिताभ गुप्ता यांच्या कारनाम्याचा फक्त हिमनग सापडला आहे. आत किती खोल दरी असेल याचा अजून थांग लागावयाचा आहे!

COMMENTS