Homeताज्या बातम्यासंपादकीय

मंत्रीमंडळाने सज्ज महाराष्ट्रातील आवाहने…..!

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काल काही ठळक घटना घडल्या; त्याची नोंद घेणं खूप आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकांच

सोलापूर विभागातील तिकीट निरीक्षकांचा गौरव
पी-वन व पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच
सांगली जिल्ह्यात 1 ली ते 8 पर्यंतच्या शाळा बंद; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काल काही ठळक घटना घडल्या; त्याची नोंद घेणं खूप आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. अर्थात, तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्राला मिळाले. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर स्पष्ट झालेली गोष्ट म्हणजे, छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावललं गेलं! छगन भुजबळ यांच्याशी आमचे मतभेद असले तरीही, मराठा आणि ओबीसी संघर्षात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती; त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणे म्हणजे एक प्रकारे ओबीसींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यासारखे आहे. दुसरी ठळक बाब म्हणजे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत १९९१ मध्ये संघाने ज्या पद्धतीने ‘डॉ. आंबेडकर ते हेडगेवार’ असा एक विशेषांक काढला होता; त्याची एक कृतिशील प्रचिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जी महाराष्ट्राच्या सामाजिक मान्यतेचा भाग कधीच राहिली नाही! त्यांनी आपल्या विजय मिरवणुकीचा प्रारंभ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केला; तर, या मिरवणुकी ची सांगता त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केली. प्रथमच अशा प्रकारची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात झालेली आहे. जी सार्वजनिकरित्या पुढे आलेली आहे. यावर महाराष्ट्र निश्चितच अंतर्मुख होऊन विचार करेल. दुसरी बाब, परभणी मध्ये संविधानाच्या मूर्तीची केलेली विटंबना आणि त्यानंतर उसळलेला हिंसाचार, यामध्ये पोलीस यंत्रणेने देखील हिंसाचार करण्यात कशी मजल गाठली, हेही दृश्य आपल्याला अनेक व्हिडिओंच्याद्वारे बघायला मिळाले; परंतु, काल पोलीस कस्टडीतून न्यायालयीन कस्टडीत गेलेल्या एका दलित तरुणाचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू एक प्रकारे खून आहे असा सामाजिक चळवळींनी आरोप केलेला आहे. या विरोधात आंदोलनाची भाषा ही सामाजिक चळवळींने केलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ अस्तित्वात येत असतानाच, त्याच दिवशी त्यावर चिंता व्यक्त होते; ही बाब देखील महाराष्ट्र सरकारला आगामी काळात एक आव्हानात्मक पाऊल म्हणून समजून घेऊन, त्यावर उपाययोजना करावी लागेल. त्याचबरोबर महाराष्ट्रात ठिकठिकाणी ज्या पवनचक्की निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्या पवनचक्कींच्या अनुषंगाने गावांमध्ये गुंडाराज परिस्थिती निर्माण करण्याची हिम्मत आता पवनचक्की ठेकेदारांची झालेली आहे. कालच महाराष्ट्राच्या एका गावामध्ये ४० ते ५० बाऊन्सर स्वरूपातले गुंड नेऊन, त्या गावात दहशत निर्माण केली गेली. त्या गावाने पवनचक्कीला परवानगी द्यावी, स्थापना करण्यासाठी गावकऱ्यांवर दबाव आणण्यात आला. या संदर्भात गावकऱ्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधूनही दोन तास बाऊन्सर सारख्या गुंडांचा गावात उच्छाद सुरू होता; परंतु, यंत्रणेने दखल घेतली नाही किंवा यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या सर्वच बाबी चिंताजनक आहेत. महाराष्ट्राच्या समाज जीवनाला आणि राजकीय जीवनाला सुरळीत करण्यासाठी प्रत्येकालाच आपली जबाबदारी निभावावी लागेल. आम्ही नेहमीच म्हणतो की सत्ता येते आणि जाते. लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणाहीकडे सत्ता अंतिम राहत नाही. त्यामुळे सत्तेचा परीघ हा नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था याच्या परिघातूनच जातो. या परिघात राहणं हे सर्वांनी स्वीकारायला हवं. तरच कोणत्याही प्रदेशाचे सामाजिक जीवन हे शांततापूर्ण राहील. शांततापूर्ण नसलेल्या जीवनामध्ये कोणत्याही घटकांच्या विकासाला वाव राहत नाही. याचा परिणाम समाज जीवनावर विपरीत होतो हे आजपर्यंत अनेक घटनांमधून सिद्ध झालेला आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी या बाबी सिद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवन महाराष्ट्राचं जे सुरळीत होतं, ते सुरळीत होण्यात नव सरकार आणि नवगठीत मंत्रिमंडळ आपलं योगदान पूर्णपणे देईल, अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. काही नव्या दमाच्या आणि काही जुन्या लोकांना घेऊन हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. ४२ लोकांचं हे जम्बो मंत्रिमंडळ म्हणावे लागेल. परंतु, तीन पक्षांच्या किंबहुना त्यापेक्षा अधिक पक्षांच्या युतीमधून साकारलेलं हे सरकार असल्यामुळे, मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या निश्चितपणे वाढेल; हे गृहीत आहे.  मंत्रिमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्राला आपल्या उत्तम कार्याचा साक्षात्कार घडवावा. महाराष्ट्राच्या जनतेला कोणत्याही प्रकारचा सामाजिक तणाव आणि संघर्ष महाराष्ट्रात उभा राहणार नाही याची काळजी घ्यावी. शिवाय, कोणत्याही समाज समूहाला दहशतीत ठेवण्यासारखा प्रकार केला जाणार नाही, याची निश्चिती मंत्रिमंडळातील सदस्यांनी समाजाला द्यावी.

COMMENTS