जगभरात सध्याच्या घडीला ज्या घडामोडी घडतांना दिसून येत आहे, त्या जर अशाच चालू राहिल्या तर, जगात तिसरे युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यातून क

जगभरात सध्याच्या घडीला ज्या घडामोडी घडतांना दिसून येत आहे, त्या जर अशाच चालू राहिल्या तर, जगात तिसरे युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यातून केवळ विनाशच होईल यात कोणतीही शंका नाही. खरंतर भारत-पाकिस्तान संघर्षाचे रूपांतर युद्धात होत असतांना ते युद्ध आपणच रोखल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराण-इस्त्रायल संघर्ष रोखता तर आलाच नाही, याउलट इराणच्या आण्विक कार्यक्रमांवर हल्ला करून अमेरिकेने या युद्धात उडी घेतली आहे. त्यामुळे इराणकडून रशिया जर मैदानात उतरला तर, या युद्धाचा शेवट विनाशात होईल यात कोणतीही शंका नाही. वास्तविक पाहता फेबु्रवारी 2022 पासून युक्रेन रशिया या दोन देशांत युद्ध सुरू आहे. तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. खरंतर हा संघर्ष लवकरात लवकर मिटवण्यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेण्याची गरज होती. सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी भेट घेत युद्ध हा पर्याय नसल्याचे ठणकावून सांगितले होते. तसे ठणकावून सांगण्याची हिंमत कोणत्याच देशाने दाखवली नाही. खरंतर इराण-इस्त्रायल या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू असतांना ट्रम्प यांनी या युद्धावर तोडगा काढण्याची गरज होती. मात्र इराणचा आण्विक कार्यक्रम रोखणे हाच अमेरिकेचा उद्देश नाही तर, खोमेनी यांचे सरकार उलथवून अमेरिकेचे धोरण मान्य करणारे सरकार त्यांना हवे आहे. त्यामुळेच हा सगळा अट्टाहास सुरू आहे. इस्त्रायलने ऑपरेशन रायजिंग लायन नाव देत इराणवर क्षेपणास्त्र डागत या युद्धाला तोंड फोडले आहे. खरंतर इराक देखील शांत बसणारा देश नाही, त्यामुळे त्यांनी देखील क्षेपणास्त्र डागत इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिले. अशावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी समन्वयाची भूमिका घेत यावर तोडगा काढण्याची गरज होती. मात्र तोडगा काढण्याऐवजी भडका कसा उडेल यावर ट्रम्प यांनी लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. खरंतर इराण या युद्धाच्या संघर्षा ओढल्या गेल्यामुळे तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. इराक हा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश आहे. भारत सर्वाधिक कच्चे तेल सौदी अरेबियाकडून मागवतो, त्यानंतर इराण-इराक या देशांकडून मागवण्यात येते. मात्र अलीकडच्या काही महिन्यात भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात सुरू करणे सुरू केले आहे. खरंतर भारत 80 टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे युद्धाचा मोठा फटका भारताला बसू शकतो, कारण तेलाच्या किंमती वाढल्यामुळे मोठे ऊर्जासंकट निर्माण होवू शकते. वास्तविक पाहता भारताकडे केवळ 42 दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा साठवून ठेवण्याची क्षमता आहे, तर दुसरीकडे चीनची ही क्षमता 8 महिने आहे. त्यामुळे या युद्धाच्या भडक्यात भारताला ऊर्जासंकटाचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी युद्ध अधिक दिवस चालणार नाही, ही दोन्ही देशांची खरी गरज आहे. कारण इराण-इस्त्रायल संघर्षात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कारण अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने सुद्धा तितक्याच त्वेषाने इस्त्रायलवर हल्ले केले आहेत, त्यात इस्त्रालच्या प्रचंड अशा भूभागाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकं विस्थापित होतांना दिसून येत आहे. त्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इतर पर्यायाचा विचार इस्त्रायल आणि अमेरिका करू शकला असता. मात्र तो पर्याय न निवडता त्यांनी थेट युद्धाचा स्वीकार केल्याचे दिसून येत आहे. शिवाय इराणच्या आण्विक कार्यक्रमात रशियाचे शास्त्रज्ञ काम करतांना दिसून येत आहे. अशावेळी रशिया जर या युद्धात तयारीनिशी उतरला तर, तिसरे महायुद्ध होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी सबुरीचे धोरण स्वीकारण्याची खरी गरज आहे, तीच काळाची गरज आहे. आजमितीस संपूर्ण जग वेगाने विकासाच्या दिशेने पावले टाकत असतांना, काही आतातायी धोरणामुळे मानवी जीवन धोक्यात येतांना दिसून येत आहे, त्याला पायबंद घालण्याची गरज आहे.

COMMENTS