Homeताज्या बातम्यादेश

किश्तवाडमध्ये दहशतवादविरोधी शोधमोहीम सुरूच

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील उंच आणि दुर्गम भागात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची व्यापक मोहीम मंगळवारी स

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांची भूमिका भलतीच!
प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगचा घटस्फोट
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील उंच आणि दुर्गम भागात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची व्यापक मोहीम मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशीही सुरू होती. या कारवाईदरम्यान संशयित हालचालींच्या आधारे अनेक स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ही संयुक्त शोधमोहीम रविवारी किश्तवाडच्या छात्रू परिसरातील सिंहपोरा लगत असलेल्या सोनार गावाजवळ सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका पॅरा कमांडोने वीरमरण पत्करले, तर सात जवान जखमी झाले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अचानक फेकलेल्या ग्रेनेडच्या स्फोटातील र्छर्यांमुळे जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलाच्या दिशेने पसार झाले. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांचा एक मजबूत तळ उद्ध्वस्त केला आहे. सुमारे 12 हजार फूट उंचीवर असलेल्या या तळातून मोठ्या प्रमाणावर हिवाळी साहित्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये अन्नधान्य, चादरी, भांडी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, हे साहित्य किमान चार दहशतवाद्यांसाठी दीर्घ काळ पुरेल इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी जम्मू झोनचे आयजीपी भीम सेन टूटी, सीआरपीएफचे आयजी आर. गोपालकृष्ण राव यांच्यासह लष्कर व पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक ड्रोन, स्निफर डॉग्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जंगलातील प्रत्येक भागाची कसून झडती घेत आहे. सोमवारी दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात मदत करणार्‍या ओव्हरग्राउंड वर्कर्स संदर्भात माहिती मिळवण्यासाठी काही स्थानिक नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांच्या स्थानिक साखळीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सकाळी जम्मूच्या सतवारी येथे बलिदान दिलेल्या स्पेशल फोर्स कमांडो हवालदार गजेंद्र सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुष्पचक्र अर्पण समारंभाचे नेतृत्व व्हाइट नाइट कोरचे कार्यवाहक चीफ ऑफ स्टाफ ब्रिगेडियर युधवीर सिंग सेखों यांनी केले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावाकडे-उत्तराखंड येथे-अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आले. लष्कराच्या व्हाइट नाइट कोरने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन त्राशी-1’ अंतर्गत संपूर्ण परिसराची घेराबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. प्राथमिक गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन ते तीन दहशतवादी या भागात लपून बसल्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू विभागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढण्याची शक्यता लक्षात घेता गुप्तचर यंत्रणांनी उच्च सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

COMMENTS