अहमदनगर/प्रतिनिधी ः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेसह दहा आरोपींवर आरोप निश्चितीची

अहमदनगर/प्रतिनिधी ः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेसह दहा आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया शुक्रवारी (23 डिसेंबर) न्यायालयात झाली. या प्रकरणात बारा आरोपी असून, यातील एक महिला आरोपी फरार आहे. त्यामुळे आता हैदराबाद येथील वकील अॅड. जनार्दन अकुला चंद्रप्पा याच्यावरील आरोप निश्चितीची प्रक्रिया बाकी असून, त्यासाठी येत्या 4 जानेवारी 2023 ला सुनावणी होणार आहे. याच दिवशी या खून प्रकरणातील मुद्देमालही न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींचा छडा लावला व यातील पाचजणांना दोन दिवसात जेरबंदही केले. ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार), फिरोज राजू शेख (राहुरी), ऋषिकेश पवार (नगर) व सागर भिंगारदिवे (नगर) यांना पकडल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर तो फरार झाल्यावर तब्बल 102 दिवसांनी त्याला आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे पकडण्यात आले. तो फरार असतानाच्या काळात त्याला मदत केल्याने अॅड. जनार्दन अकुला चंद्रप्पा, शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ व पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (महिला आरोपी-फरार, सर्व राहणार हैदराबाद, आंध्रप्रदेश) आणि नगरमधील महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी) या सहाजणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीडीओ कॉन्फरन्स सुनावणी – शुक्रवारी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीस चार आरोपी हजर होते तर बाळ बोठेसह सहा आरोपी नाशिक कारागृहातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. अॅड. जनार्दन चंद्रप्पा वगळता अन्य दहाजणांविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया करण्यात आली. अॅड. अकुला याच्यावतीने गैर हजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने तो मंजूर करताना ही शेवटची संधी असल्याचेही बजावले. त्यानंतर सहा आरोपींचा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे व न्यायालयात उपस्थित चार आरोपींवरील आरोप निश्चिती केली गेली. या दहाही आरोपींचे आरोप निश्चितीबाबतचे निवेदनही नोंदवून घेण्यात आले. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या 4 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. त्यावेळी आरोपी अॅड. जनार्दन चंद्रप्पा याच्यावरील आरोप निश्चिती होणार असून, पोलिसांद्वारे या खून प्रकरणातील जप्त मुद्देमाल न्यायालयासमोर हजर केला जाणार आहे. दरम्यान, बोठे परिवाराने शहर सहकारी बँकेतील ठेवी मिळाव्यात म्हणून न्यायालयासमोर अर्ज केला असून, न्यायालयाने आदेश देऊनही बँकेने कार्यवाही केली नसल्याने न्यायालयाच्या अवमानाचा अर्ज केला आहे. त्यावरही चार जानेवारीला सुनावणी व युक्तिवाद होणार असल्याची माहिती रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांच्यावतीने काम पाहणारे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी दिली.
COMMENTS