कानपूर : भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तांत्रिक प्रगतीला आत्मसात करणे आवश्यक असून धोरणात्मक विचारपद्धत

कानपूर : भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने येणार्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तांत्रिक प्रगतीला आत्मसात करणे आवश्यक असून धोरणात्मक विचारपद्धती आणि जुळवून घेण्याची तयारी आवश्यक असल्याचे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले. शुक्रवारी जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते आय.आय.टी.कानपुर येथे ’टेककृती 2025’, या आशिया खंडातील सर्वात भव्य आंतरमहाविद्यालयीन तंत्रज्ञान आणि उद्योजकता महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी झालेल्या अनौपचारिक संवादात त्यांनी भारतीय सशस्त्र दलांमध्ये प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या गरजेचे महत्व सांगितले. भविष्यातील युद्धांच्या बाबतीत विशेषतः सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि संज्ञानात्मक क्षेत्रांमधील आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या सज्जतेबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्वान, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्सना जनरल चौहान यांनी शिस्त, लवचिकता, धैर्य आणि त्याग या मूल्यांचे महत्व सांगितले. तसेच संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या महोत्सवाची वर्षीची संकल्पना पंता रेई (सर्व काही सतत बदलत असून कोणतीच गोष्ट स्थिर नाही), अशी असून ती तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या निरंतर होणार्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकते. टेककृती 2025’ हा महोत्सव तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सहकार्य यांची सांगड घालणारा एक अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम असून त्या माधयमातून शोध आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील सीमा ओलांडल्या जातात. याशिवाय अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे ’रक्षाकृती’ हे समर्पित संरक्षण प्रदर्शन, हा विशेष विभाग टेककृती 2025 चे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. देशातील सशस्त्र दल, शैक्षणिक संस्था आणि संरक्षण उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्याविषयी जनरल अनिल चौहान यांनी नवोदित तंत्रज्ञांशी देखील संवाद साधला.
COMMENTS