Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्ष सोडण्याच्या चर्चेला घुलेंच्या मेळाव्यात पूर्णविराम

पवारांचा झाला जयजयकार, भाजपवर टीकास्त्र

अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने शेवगाव-पाथर्डीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले क्

देशात एकाधिकारशाहीचे राजकारण सुरू ः ज्ञानदेव वाफारे
सोनईत सलग चौथ्या दिवशीही पाऊस
राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती घुलेंवर टक्केवारीचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने शेवगाव-पाथर्डीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले क्रांतिकारी निर्णय घेऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या मागील आठ दिवसांपासूनच्या चर्चेला मंगळवारी (14 मार्च) पूर्णविराम मिळाला. घुले यांनी शेवगावला घेतलेल्या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले व ते करताना, (स्व.) मारुतराव घुले पाटील कुटुंबाने ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना कायम साथ दिलेली आहे व ती आजही कायम आहे, असे आवर्जून स्पष्ट केले. यावेळी शरद पवारांच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या गेल्या. दरम्यान, या मेळाव्यात घुलेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना आगामी सर्व निवडणुकांतून भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे उद्दिष्ट आवर्जून समर्थकांसमोर स्पष्ट केले.

सर्वपक्षीयांची राजकारण विरहित कारभार करणारी संस्था म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी दिली होती. पण महाविकास आघाडीचे 14 संख्याबळ असतानाही पाचजण फुटल्याने भाजपचे उमेदवार व राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी घुले यांचा अवघ्या एक मताने पराभव केला व अध्यक्षपद पटकावले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीत भूकंप झाल्याची स्थिती होती व खुद्द घुले यांनीही अध्यक्ष निवडीत झालेल्या राजकारणावर भाष्य करण्यास टाळल्याने तोही चर्चेचा विषय झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रमुख समर्थकांची त्यांनी बैठक घेतली व मंगळवारी समर्थकांचा मेळावाही आयोजित केल्याने व यानिमित्ताने मला आपल्याशी बोलायचंय..मी येतोय…आपणही या…अशी भावनिक साद घातल्याने ती चर्चेची झाली होती. घुले काहीतरी क्रांतिकारी निर्णय घेऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकणार, अशीही चर्चा होती. पण मंगळवारी झालेल्या मेळाव्यात या चर्चेला पूर्णविराम मिळाला व घुले पक्ष सोडणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले. उलट, भाजपने जिल्हा बँकेत केलेल्या राजकारणाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणात त्याचे स्वागत केले.

भाजपला धडा शिकवावा लागेल – यावेळी बोलताना चंद्रशेखर घुले म्हणाले, येत्या जिल्हा परिषद-पंचायत समिती व विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकसंध होऊन व भाजपचा करेक्ट कार्यक्रम करून योग्य धडा शिकवावा लागेल. त्यासाठी संघटितपणे राष्ट्रवादीसोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करून ते म्हणाले, मी राजकीय डावपेचात काही कच्चा नाही, हेे येत्या निवडणुकीत व भविष्यात भाजपला समर्थपणे दाखवून देणार आहे. जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच नव्हते. प्रथमच भाजपने पक्षीय भूमिका घेतली आहे. मात्र, भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे आहे अशा अनेक भूलथापा देऊन व जातीपातीचे राजकारण करून विजय संपादन केला. पण, आज मतदार संघात काय अवस्था आहे? साडे आठ वर्षात मतदारसंघात काय विकास केला? असा सवाल त्यांनी केला. होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. त्यासाठी एकसंध राहून व मतदार संघात तळागळात जावून जनतेचे प्रश्‍न समजावून घेवून कोणत्याही परिस्थितीत सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सफा होण्याचे आवाहन घुले पाटील यांनी आक्रमक शैलीत विरोधी भाजपवर जोरदार टीका केली.

यावेळी केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी मार्गदर्शन करून भाजपच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी बद्री बर्गे, बाळासाहेब ताठे, मन्सूर फरोकी, काकासाहेब नरवडे, शिवशंकर राजळे, मयूर वैद्य, डॉ. क्षीतिज घुले पाटील, माजी आ. पांडुरंग अभंग यांची भाषणे झाली तर आभार भाऊराव भोंगळे यांनी मानले. या मेळाव्यात नरेंद्र घुले पाटील, बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादी युवकचे कपिल पवार, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, संजय फडके, काशिनाथ नवले, बंडू बोरुडे, माजी सभापती अरुण लांडे पाटील, राजेंद्र दौंड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, गणेश गव्हाणे, नंदू मुंडे यांच्यासह पाथर्डी, शेवगाव व नेवासा तालुक्यातील समर्थक उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांवर टीका, पण… अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत घुले पाटील यांना राष्ट्रवादीत फूट पडल्याने एक मताने पराभव पत्करावा लागला. तो त्यांच्या समर्थकांच्या अत्यंत जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीच्या फुटीर संचालकांवर कारवाई करून जिल्हाध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी घुले समर्थकांनी उघडपणे केली होती व तातडीने शेवगाव येथे मेळावा घेतल्याने या मेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. घुले काही राजकीय वेगळा निर्णय घेतात काय, अशी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होती, परंतु घुले बंधूंनी पक्षांतर्गत फुटीरांऐवजी विरोधक भाजपविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत भविष्यात भाजपला नामोहरम करण्यासाठी भूमिका जाहीर केली आहे.

COMMENTS