बुलढाणा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी २३
बुलढाणा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी २३ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली. जिल्हयात पावसाने कहर केला आहे. जिल्हयातील २० महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी सकाळी सहा ते अकरा वाजेदरम्यान २८३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेती साहित्य वाहून गेले. जळगाव शहरातून वाहणाऱ्या पद्मावती नदीला पूर आल्याने काठावरील ५०० घरे बाधित झाली. संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, खामगाव तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस बरसला. नदी- नाल्यांना पूर आल्याने हजारो हेक्टरवरील शेती खरडली. पिकांची अतोनात हानी झाली. अनेक जनावरे दगावली.
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथील मधुकर धुळे या शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कधी नव्हे इतका पाऊस या भागात पडला. रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जळगाव जामोद- नांदुरा, जामोद- अकोट, जळगाव-बऱ्हाणपूर, खेर्डा- जामोद, टूनकी- वरवट बकाल, वानखेड-दुर्गादैत्य, संग्रामपूर- वरवट बकाल हे मार्ग बंद होते. कित्येक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे शेतकरी, नागरिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
COMMENTS