पीक कर्जासाठी 15 हजारांची मागणी - शेतकर्यांमध्ये तीव्र संतापमाजलगाव । प्रतिनिधीमाजलगाव येथील नवीन बसस्थानकासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया (डइख) शाखेत

पीक कर्जासाठी 15 हजारांची मागणी – शेतकर्यांमध्ये तीव्र संताप
माजलगाव । प्रतिनिधी
माजलगाव येथील नवीन बसस्थानकासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया (डइख) शाखेत रब्बी पीक कर्जाच्या नावाखाली दलालांचा सुळसुळाट सुरू असून, कर्ज मंजुरीसाठी प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. यामुळे खरे शेतकरी आर्थिक व मानसिक तणावात सापडले असून प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास शेतकर्यांचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे – सातबारा, 8-अ, पिकांची नोंद आदी सादर करूनही रब्बी हंगामाचे पीक कर्ज मिळत नसल्याची तक्रार केली आहे. मात्र दलालामार्फत अर्ज केल्यास अपूर्ण कागदपत्रांवरही तात्काळ कर्ज मंजूर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे बँकेतील काही अधिकारी व कर्मचार्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. खरीप हंगामात व्याजाने पैसे काढून पेरणी केलेली पिके पावसाच्या लहरीपणामुळे उद्ध्वस्त झाली. तरीही खरीप गेलं, रब्बी तरी संसार वाचवेल या आशेने शेतकरी पुन्हा एकदा बँकेच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र माजलगाव एसबीआय शाखेतील अधिकारी खर्या शेतकर्यांना डावलून दलालांना प्राधान्य देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. काही शेतकर्यांना तर थेट बँकेतून हाकलून ‘दलालामार्फत या’ अशा सूचनाही दिल्या जात असल्याचे सांगण्यात येते. एका पीक कर्जामागे 15 हजार रुपये मिळत असल्याने बँक कर्मचार्यांची ‘दिवाळी’ साजरी होत असल्याची संतप्त चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांची अक्षरशः फरफट होत आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवणार्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही तर शेतकर्यांचा संयम सुटू शकतो, असा इशाराही देण्यात येत आहे. तसेच धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी बँक अधिकारी व दलालांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर माजलगाव तालुक्यात शेतकर्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सध्या शेतकरी वर्गात सुरू आहे.

COMMENTS