पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथील दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी यश मिळवत 66 वर्षीय महिलेच्या उदरातील सुमारे 4 किलो वजनाचा

पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथील दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी यश मिळवत 66 वर्षीय महिलेच्या उदरातील सुमारे 4 किलो वजनाचा ओव्हेरियन ट्यूमर यशस्वीरीत्या काढून तिचे प्राण वाचवले.
रुग्णाला काही काळापासून पोटात सूज आणि अस्वस्थता जाणवत होती. मात्र शस्त्रक्रियेची भीती असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. डॉक्टरांच्या समुपदेशनानंतर अखेर त्यांनी शस्त्रक्रियेस संमती दिली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सर्जन डॉ. प्रशांत केदारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्षितिजा गायके यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी करून ओव्हेरियन ट्यूमर काढण्यात आला तसेच ओमेंटल बायोप्सी करण्यात आली. त्याचवेळी रुग्णाच्या अपेंडिक्समध्ये अनेक दगड (मल्टिपल अपेंडिकोलिथ) आढळल्यामुळे अपेंडिक्सही काढण्यात आले. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. प्रवीण थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेदरम्यान केवळ सुमारे 100 मिलीपेक्षा कमी रक्तस्राव झाला, ही बाब विशेष उल्लेखनीय मानली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णाची शस्त्रक्रियेनंतरची काळजी नर्सिंग स्टाफने अत्यंत दक्षतेने घेतली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांचे मनापासून आभार मानले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण वैद्यकीय टीमच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जीवनज्योती हॉस्पिटलचे चीफ ऑपरेशन ऑफिसर संदिप कांबळे यांनी याबद्दल माहिती दिली.

COMMENTS