मुंबई ः महायुती सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरूवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. या विधेयक
मुंबई ः महायुती सरकारचे महत्वाकांक्षी विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक गुरूवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. या विधेयकावर चर्चा झडल्यानंतर आवाजी मतदानाच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यात आले.या विधेयकातून कोणताही दुरूपयोग होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून सदर विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन देखील त्यांनी विधानसभेला केले.
या विधेयकावर बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी प्रस्ताव मांडत आहे. याठिकाणी आपल्याला कल्पना आहे की, हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनात सभागृहात मांडले होते. त्यानंतर सदस्यांनी यावर विस्तृत चर्चा करण्याची गरज व्यक्त केली होती. राज्य सरकारलाही या विधेयकाविषयी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा होत्या, त्या अफवांना योग्य उत्तर मिळाले पाहिजे व लोकशाही पद्धतीने हे विधेयक मंजूर झाले पाहिजे म्हणून आपण ते विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, नाना पटोले, भास्करराव जाधव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, दीपक केसरकर, अनिल पाटील, मनिषा चौधरी, मंगेश कुडाळकर, अजय चौधरी आदी सदस्यांचा समावेश होता. या सर्वांनी या विधेयकावर काम केले.
त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज चर्चा करून त्याचप्रमाणे जनतेच्या जवळपास 12 हजार सूचनांचे वर्गीकरण करून आपला अंतिम अहवाल या सभागृहाला सादर केला. या अहवालाला कोणतीही डिसेन्ट नोट नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. ही समाधानाची गोष्ट आहे. विरोधकांनी जे जे सांगितले ते सर्व मान्य करण्यात आले आहे, असे फडणवीस या विधयेकाचे समर्थन करताना म्हणाले.


COMMENTS