नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक ११

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त्ताने विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे ऑनलाईन पद्धतीने ‘मौलाना आझाद यांचे शैक्षणिक योगदान आणि आजच्या काळातील त्याची उपयुक्तता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाचे (पुणे) सेवानिवृत्त प्रा. दत्तात्रय तापकीर यांनी हे व्याख्यान दिले.
आपल्या व्याख्यानात बोलतांना प्रा. तापकीर म्हणाले की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे नवीन शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीची पायाभरणी करण्यात मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मह्तवपूर्ण योगदान होते. शिक्षणविषयक १९४८ सालातील डॉ. राधाकृष्ण आयोग व माध्यमिक शिक्षणाचा १९५२ चा मुदलियार आयोग बनविण्यात त्यांचा सहभाग होता. ते एक लोकप्रिय राजकीय नेते, पत्रकार, लेखक – अनुवादक यासोबत आधुनिक विचारांचे व स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे उदारमतवादी होते. सर्व धर्मांचा गाढा अभ्यास व भाषेचा व्यासंग असणारे तत्वज्ञानाचे साक्षेपी अभ्यासक होते. आधुनिक, धर्मनिरपेक्ष, उदारीकरणासह विविधतेतील एकतेकडे घेवून जाणारी शिक्षणपद्धती त्यांना पसंद होती. स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरणाचे ते पुरस्कर्ते होते. शिक्षण ही निरंतर चालणारी समग्र प्रक्रिया आहे यावर त्यांचा विश्वास होता. ते भारतीय राष्ट्रवादाचे समर्थक तसेच आचार विचाराने भारतीय होते, असे प्रा. तापकीर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.
प्रास्ताविक विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. वर्षा बहिरम यांनी केले. आभारप्रदर्शन विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विभागीय केंद्रे व अभ्यासकेंद्रे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

COMMENTS