नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यां
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणार्या आणि आपले आयुष्य पणाला लावणार्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि आल्हाददायक हवामानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर अलिकडेच सामायिक केलेली छायाचित्रे पाहून जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याची आपली उत्सुकता आणखी वाढली. आपल्या पक्षासाठी काम करत असताना सुरुवातीच्या काळात या भागाला अनेकदा भेट दिल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. सोनमर्ग, गुलमर्ग, गंदेरबल आणि बारामुल्ला सारख्या परिसरात बराच वेळ व्यतीत केल्याचा, कित्येकदा तासनतास चालत अनेक किलोमीटर प्रवास केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जोरदार बर्फवृष्टी असूनही, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या स्नेहामुळे थंडी जाणवली नव्हती असे त्यांनी नमूद केले. आजचा दिवस विशेष होता असे सांगत देशभरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रयागराजमध्ये महाकुंभला प्रारंभ झाला असून लाखो लोक तिथे पवित्र स्नानासाठी जमले आहेत असे त्यांनी नमूद केले. पंजाब आणि उत्तर भारतातील इतर भागात लोहडी साजरी केली जात आहे असे सांगत उत्तरायण, मकर संक्रांती आणि पोंगल या सणांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. हे सण साजरे करणार्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी खोर्यातील चिल्लई कलानच्या 40 दिवसांच्या आव्हानात्मक कालावधीची दखल घेतली आणि तिथल्या लोकांच्या लवचिकतेची प्रशंसा केली. त्यांनी अधोरेखित केले की हा ऋतू सोनमर्ग सारख्या पर्यटन स्थळांसाठी नवीन संधी घेऊन येतो, देशभरातील पर्यटकांना आकर्षित करतो जे काश्मीरच्या जनतेच्या आदरातिथ्याचा आनंद लुटतात. जम्मू रेल्वे विभागाची नुकतीच झालेली पायाभरणी अधोरेखित करून पंतप्रधानांनी तेथील लोकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण भेट असल्याचे जाहीर केले. तेथील जनतेची अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती असे ते म्हणाले. सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या लोकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाल्याचे घोषित करत मोदी यांनी अधोरेखित केले की हा बोगदा सोनमर्ग, कारगिल आणि लेहमधील लोकांचे जीवन लक्षणीयरीत्या सुखकर बनवेल. हिमस्खलन, जोरदार हिमवर्षाव आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींमुळे नेहमीच रस्ते बंद होऊन निर्माण होणार्या समस्यांमध्ये या बोगद्यामुळे घट होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच या बोगद्यामुळे मोठ्या रुग्णालयांकडे जाण्यासाठी रस्त्यांच्या उपलब्धतेत सुधारणा होईल आणि अत्यावश्यक पुरवठ्याची उपलब्धता देखील सुनिश्चित झाल्याने नागरिकांना भेडसावणार्या समस्यांमध्ये घट होणार आहे यावर त्यांनी भर दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये नवे उद्योग आकर्षित करण्याचा प्रयत्न
जम्मू आणि काश्मीर मधील युवकांना उपलब्ध होणार्या नवीन संधींबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की जम्मू आणि अवंतीपोरामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्सचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे, ज्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी देशाच्या इतर भागांत जाण्याची गरज कमी झाली आहे. जम्मूमधील आय आय टी, आयआयएम, तसेच केंदीय विद्यापीठ परिसरांमध्ये उत्तम शिक्षण दिले जात असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. जम्मू व काश्मीर सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांचा तसेच पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन प्रगती साधत असलेल्या स्थानिक कारागीर व हस्तकलाकारांच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. या क्षेत्रात रु 13000 कोटी च्या गुंतवणुकीसह नवे उद्योग आकर्षित करण्यासाठी सातत्याने सुरु असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले यातून युवकांसाठी हजारो रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS