मुंबई ः मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक मनोज जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत असल्यानंतर सोमवा
मुंबई ः मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आंदोलक मनोज जरांगे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत असल्यानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांना आहेत. आणि मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका घेतली आहे, असे असतांना जर मराठा आरक्षणात बाधा आणल्याचे सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेईल अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मराठा समाजासाठी जे काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. ते सर्व निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतलेले आहेत. किंवा आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी एखादा निर्णय घेतला आणि त्याला मी थांबवण्याचा प्रयत्न केला असे जर ते म्हणाले, तर त्या क्षणी माझ्या पदाचा देखील राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील संन्यास घेईल, अशा शब्दात त्यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना तसे करु देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्याला आता फडणवीसांनही प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे, हे मला मान्य आहे. मात्र राज्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख आहेत. आम्ही त्यांच्या सोबत काम करत आहोत. आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. मराठा समाजासाठी एखादा निर्णय जर मुख्यमंत्री शिंदे घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल असे त्यांनी सांगितले तर त्याच वेळी पदाचा राजीनामा देईल. इतकेच नाही तर राजकारणातूनही संन्यास घेईल असे प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या लोकांना काहीही माहिती नसते, तेच लोक अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. निवडणुका कोण घोषित करतो? त्यांचे काय अधिकार काय आहेत? या गोष्टी ज्यांना माहिती नाही किंवा या संदर्भातली ज्यांना पूर्णपणे माहिती नाही, ते अशा पद्धतीचा आरोप करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुळात निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राबद्दल खुलासा केला आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे, हे अतिशय चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणात फडणवीसांची भूमिका मोलाची ः मुख्यमंत्री शिंदे – मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका आहे. यापूर्वी देखील ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठा समाजासाठी विविध योजना आणल्या. यावेळी देखील आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला. यात फडणवीसांसह अजित पवार यांचा देखील मोठा सहभाग होता. त्यामुळे मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे, असे म्हणणे चूकीचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडत जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सोमवारी राज्यभरातील महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी राख्या पाठवल्या होत्या. तर मुंबईसह राज्यभरातील महिला भगिनी शिंदे यांना राखी बांधण्यासाठी वर्षा बंगल्यावर देखील दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला.
COMMENTS