Homeताज्या बातम्यासंपादकीय

महायुती आणि महाविकास आघाडीतील साम्य !

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे आक्रमक नेते उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा, यशस्वी झाल्याचे प्रसारमाध्यमातून वाच्यता केली जा

ईलेक्ट्राॅल बाॅण्ड आणि गल्ली दादा ! 
निवडणुका आणि कालावधी !
जात्याभिमानींची फसवी वंश शुध्दी !

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे आक्रमक नेते उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा, यशस्वी झाल्याचे प्रसारमाध्यमातून वाच्यता केली जात आहे. वास्तविक, हा दौरा ज्या पद्धतीने त्यांनी केला त्यावरून, अयशस्वी म्हणता येणार नाही. परंतु, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी नेमकं कोणाचं नाव असावं, यासंदर्भात मात्र महाविकास आघाडीने नाव जाहीर न करण्याचे धोरण अवलंबलं आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटामध्ये जो जास्त जागा जिंकून येईल, त्याला मुख्यमंत्री पद मिळावं, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा लढायला मिळतात, यावरच त्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येण्याचे यश अवलंबून आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई हा राजकीय सत्तेसाठी एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतील धारावी ही उद्योजक अडाणी यांना विकासासाठी दिल्यानंतर, धारावीकरांचं पुनर्वसन त्या ठिकाणी न करता मुंबईच्या इतर उपनगरांमध्ये खास करून मुलुंड, कुर्ला अशा ठिकाणी जागा मिळवत अडाणी धारावीकरांना तेथे पुनर्वसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या भूमिकेला महायुती सरकार जसं जागा बहाल करून प्रोत्साहन देत आहे, तसंच महाविकास आघाडी त्यांना विरोध करण्याचं कोणतेही धोरण अवलंबत नसल्याचे दिसते. अदानी यांचा धारावी विकास प्रकल्प हा मुंबई आणि एमएमआरडीए विभाग महाराष्ट्रापासून वेगळा पाडण्याचा प्रयत्न आहे काय, अशी चर्चा आता सुप्त स्वरामध्ये आतमध्ये होऊ लागली आहे. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी वारंवार अडाणी यांच्या विरोधात संसदेत भुमिका घेतली; परंतु काँग्रेसचे इतर नेते अशी भूमिका घेत नाही.

खास करून महाराष्ट्र काँग्रेसने अडाणी यांच्या मुंबई किंवा धारावी विकासाच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. महाविकास आघाडीचे एक शिल्पकार नेते, शरद पवार यांनी तर अवघ्या पंधरा दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतली. प्रसारमाध्यमांनी यामागे मराठा आरक्षणाचा प्रश्न असल्याची चर्चा केली असली, तरी, प्रत्यक्षात मात्र मुंबईच्या ज्या जागा आहेत, त्या अदानी यांना देण्या संदर्भातच ही भेट होती, अशी आता सूप्त चर्चा आहे. अर्थात, अडाणी यांच्या मुंबई विकासाच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच भूमिका घेतली होती की, आम्ही मुंबईला अडाणी सिटी होऊ देणार नाही; परंतु, प्रत्यक्षात महाविकास आघाडी पक्षांकडे तसा कोणताही ठोस कार्यक्रम नाहीये. त्यामुळे अडाणी यांना मुंबई च्या एकंदरीत प्रकल्पामध्ये त्यांना जे काही करायचं आहे, त्यापासून रोखणारी कोणतीही राजकीय शक्ती सध्या तरी दिसत नाही, असा मुंबईकरांचा होरा आहे! धारावीकरांची मुलुंड किंवा कुर्ला या धारावी वगळता इतर भागात पुनर्वसित होण्याची मानसिक तयारी नाही. धारावी हे आतापर्यंत एक उद्योग केंद्र राहिले आहे. धारावीतील कारागीर आणि कलाकार यांचं हे उद्योग क्षेत्र आहे. या उद्योग क्षेत्राचा विस्तार सातासमुद्र पार निर्यात करून झालेला आहे. त्यामुळे, या ठिकाणी वास्तव्याला असणारे नागरिक हे झोपडीधारी असले तरी, ते प्रामुख्याने उद्योजक आहेत; ही भूमिका अद्यापही समजून घेता आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या, यांची भूमिका अदानी यांच्याबाबत मात्र समान आहे! आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी महाविकास आघाडीकडेही कोणतीही ठोस भूमिका नाही. किंबहुना, महायुतीपेक्षा वेगळी अशी भूमिका त्यांच्याकडे नाही. त्यामुळे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बरोबरीची टक्कर असेल, हे मात्र विसरता कामा नये!

COMMENTS