फलटण / प्रतिनिधी : श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील सुमारे 176 कर्मचार्यांची ग्रॅच्युइटी व कामगार अनामत अशी 5 कोटींहून अधिक थकीत रक्कम
फलटण / प्रतिनिधी : श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील सुमारे 176 कर्मचार्यांची ग्रॅच्युइटी व कामगार अनामत अशी 5 कोटींहून अधिक थकीत रक्कम असून, त्याची शब्दाप्रमाणे पूर्तता केली आहे. कोणाच्या उपोषण किंवा आंदोलनामुळे नव्हे, तर कामगारांचे जुने संबंध जपण्याचा आपला प्रयत्न असल्याचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील कामगारांची ग्रॅच्युइटी व कामगार अनामत त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर कामगारांनी एकत्र येऊन रामराजे यांची त्यांच्या येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
ना. रामराजे म्हणाले, श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडल्यानंतर त्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊन या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी श्रीराम अवसायनात काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हित लक्षात घेऊन आपण तज्ज्ञ व्यक्तींचे सल्ले न मानता कारखाना सुरू ठेवला. 15 वर्षे झगडल्यानंतर आज चांगले दिवस आल्यामुळे कामगार व ऊसउत्पादक समाधानी आहेत.
श्रीराम साखर कारखान्यामध्ये कोणी राजकारण न करता आपल्यामुळेच हे देणे दिले असे मानण्याचे कारण नाही. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण उपोषणाला बसला आहात ते या कारखान्याला ऊस घालत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता या निवृत्त कामगारांनी आपली दिवाळी गोड करावी, असे त्यांनी सांगितले.
निवृत्त 176 कामगारांना लाभ
सन 2017 ते मार्च 2021 दरम्यान श्रीराम कारखाना व अर्कशाळेतून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 176 जुन्या कामगारांना 4 कोटी 68 लाख 80 हजार 201 रुपये ग्रॅच्युइटी आणि 51 लाख 76 हजार 418 रुपये 93 पैसे अशी एकूण 5 कोटी 20 लाख 56 हजार 619 रुपये 93 पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
COMMENTS